तुकोबांच्या पालखीचे प्रस्थान

महाराष्ट्र टाइम्स
तुकोबांच्या पालखीचे प्रस्थान
(फोटो- महाराष्ट्र टाइम्स)
ज्ञानोबा तुकारामचा गजर...वरुणराजाची बरसात... आणि भक्तीरसात न्हालेल्या भक्तांचा अलोट उत्साह... अशा वातावरणात जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराज यांच्या पालखीने देहू येथून पंढरपूरकडे मंगळवारी (सात जुलै) रोजी दुपारी चार वाजून दोन मिनिटांनी प्रस्थान ठेवले.

इनामदार वाड्यातून दुपारी अडीचच्या सुमारास महाराजांच्या पादुका देऊळवाड्यातील भजनी मंडपात आल्या. त्यानंतर प्रस्थान सोहळ्याच्या कार्यक्रमास प्रारंभ झाला. या वेळी आलेल्या दिंड्यांना मंदिरात प्रवेश देण्यात आला. ब्रह्मवृंदांच्या उपस्थितीत मंत्रघोषात पादुकापूजन करण्यात आले. चांदीच्या सिंहासनावर, चांदीच्या पादुकांना अभिषेक करण्यात आला. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, खासदार श्रीरंग बारणे, माजी खासदार छत्रपती संभाजीराजे, आमदार सुनील शेळके, महेश लांडगे यांच्या हस्ते पादुकांची पूजा करण्यात आली.
दुपारी चार वाजून दोन मिनिटांनी पालखीने प्रस्थान ठेवले. सायंकाळी पाच वाजता पालखी प्रदक्षिणा, पालखी इनामदार वाड्याकडे मार्गस्थ झाली. रात्री इनामदार वाड्यात पालखी सोहळ्याचा मुक्काम आहे. आज, बुधवारी सकाळी पालखी पिंपरी-चिंचवडकडे मार्गस्थ होणार आहे.

इंद्रायणीला आलेल्या पुरामुळे, वारकऱ्यांनी पालखी सोहळ्यात पुण्यात सामील व्हावे, असे आवाहन मंदिर प्रशासनाने केले होते. त्यामुळे मोजकेच वारकरी प्रस्थान सोहळ्याला उपस्थित होते. पावसाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाच्या सूचनेला वारकऱ्यांनी प्रतिसाद दिल्याचे पाहायला मिळाले. सन १९९५मध्ये इंद्रायणी नदीला असाच पूर आला होता. त्यानंतर यंदाचा सोहळा तुलनेने कमी वारकऱ्यांच्या उपस्थितीत झाला, अशी आठवण ग्रामस्थांनी सांगितली.

मंदिरात महापूजा सुरू असताना मंदिर परिसर टाळमृदंगांच्या निनादाने फुलून गेला होता. भाविकांनी फुगड्यांचा धरलेला फेर, भान हरपून टाळाच्या तालावर नाचणारे वारकरी, असे भक्तिमय वातावरण देहूमध्ये तयार झाले. वैष्णवांच्या उपस्थितीत देऊळवाड्याच्या प्रदक्षिणेनंतर पालखीचा पहिला मुक्काम इनामदार वाड्यात झाला.

उपमुख्यमंत्र्यांकडून पूजा

उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या हस्ते पादुकांची पूजा करण्यात आली. त्यांनी मंदिराला प्रदक्षिणा घालून प्रस्थान सोहळा अनुभवला. ‘पंढरीची वारी सुखरूप पार पडू दे, बळीराजा सुखी होऊ दे,’ अशी भावना पवार यांनी व्यक्त केली. या वेळी दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या आठवणीने सुनेत्रा पवार भावूक झाल्या.