देशभरात पावसाचा हाहाकार सुरूच

महाराष्ट्र टाइम्स.कॉम
देशभरात पावसाचा हाहाकार सुरूच
देशाच्या अनेक भागांत पावसाचा धुमाकूळ सुरूच असून, काही राज्यांमधील जनजीवन मोठ्या प्रमाणात विस्कळीत झाले आहे. प्रामुख्याने उत्तर भारताला पावसाचा जोरदार फटका बसला आहे. मुसळधार पावसामुळे हिमाचल प्रदेशातील सिरमौर आणि सोलन जिल्ह्यांमधील सर्व सरकारी व खासगी शैक्षणिक संस्था आणि अंगणवाड्या शुक्रवारी बंद ठेवण्यात आल्या. दरम्यान, वेगवेगळ्या घटनांमध्ये एकाचा मृत्यू झाला, तर दोघे जखमी झाले आहेत.

हवामान विभागाने राज्यातील अनेक भागांत मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवला आहे. तसेच दरडी कोसळणे, अचानक पूर येणे, झाडे उन्मळून पडणे आणि रस्ते बंद होणे यांसारख्या घटनांबाबत सावधगिरीचा इशारा दिला आहे. ‘संततधारेमुळे विशेषतः ग्रामीण आणि डोंगराळ भागांत ग्रामीण रस्ते पाण्याखाली जात आहेत. भूस्खलनाचा धोका वाढला असून, सामान्य जनजीवन विस्कळीत झाले आहे. प्रतिकूल हवामान स्थितीमुळे संपूर्ण जिल्ह्यातील शालेय विद्यार्थ्यांचे जीवन आणि सुरक्षा धोक्यात येण्याची शक्यता आहे’, असे सिरमौर आणि सोलनच्या उपायुक्तांनी स्वतंत्रपणे जारी केलेल्या आदेशांमध्ये म्हटले आहे. सोलन जिल्ह्यात अर्की भागात चालत्या वाहनावर डोंगरावरून दगड पडल्याने दोन जण जखमी झाले, तर कालका-शिमला राष्ट्रीय महामार्गावरही अनेक ठिकाणी अशाच घटना घडल्या. महामार्गावर वाकनाघाट आणि कंडाघाट, तसेच धरमपूर आणि चक्की मोडदरम्यान दगड कोसळल्या आहेत. मुसळधार पावसामुळे सिरमौर जिल्ह्यातील अनेक रस्ते पाण्याखाली गेले आहेत. शिमला जिल्ह्यातील विकासनगर येथे एक भिंत कोसळून रस्त्याच्या कडेला उभ्या केलेल्या दोन वाहनांचे नुकसान झालल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.
त्रिपुरामध्ये ११ हजार नागरिक विस्थापित

अगरतळा : गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे त्रिपुरातील तीन जिल्ह्यांत पूरस्थिती निर्माण झाली असून, यामुळे सुमारे ११ हजार नागरिकांना मदत छावण्यांमध्ये आश्रय घ्यावा लागला आहे. मात्र, आत्तापर्यंत जीवितहानी झाल्याचे वृत्त नाही. राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवला आहे.

मिझोरममध्ये अनेक कुटुंबे सुरक्षित स्थळी

आयझॉल : बांगलादेशच्या सीमेला लागून असलेल्या मिझोरममधील लुंगलेई जिल्ह्यात आठवडाभरापासून सुरू असलेल्या संततधारेमुळे खाऊथलांगतुईपुई नदीने धोक्याची पातळी ओलांडली आहे. त्यामुळे ८०हून अधिक कुटुंबांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले आहे. राज्यात २९हून अधिक ठिकाणी दरडी कोसळणे, दगड पडणे आणि पावसाशी संबंधित इतर घटनांचीही नोंद झाली आहे. मात्र, आत्तापर्यंत जीवितहानी झाल्याचे वृत्त नाही.