Permission Granted To Re collect Signature Samples Of Accused In Neet Paper Leakage Case
आरोपीचे हस्ताक्षर नमुनेपुन्हा घेण्यास परवानगी
महाराष्ट्र टाइम्स.कॉम•
‘नीट’ पेपरफुटी प्रकरणातील एका आरोपीचे अतिरिक्त हस्ताक्षर किंवा स्वाक्षरीचे नमुने घेण्याची मागणी करणारी सीबीआयची याचिका दिल्ली न्यायालयाने मंजूर केली आहे. विशेष न्यायाधीश अजय गुप्ता हे आरोपी मनीषा संजय हवालदार हिच्या अतिरिक्त हस्ताक्षर नमुन्यांची मागणी करणाऱ्या तपास यंत्रणेच्या अर्जावर सुनावणी करत होते.
सरकारी वकिलांनी न्यायालयाला सांगितले, की हवालदार हिने सहआरोपी मनीषा मांढरे हिच्यासोबत भौतिकशास्त्राचे हस्तलिखित प्रश्न ‘शेअर’ केले होते; तसेच तिने दुसरा आरोपी तेजस हर्षदकुमार शहा याला भौतिकशास्त्राचे प्रश्न सांगितले होते. तपासादरम्यान मांढरेच्या फोनमधून भौतिकशास्त्राच्या प्रश्नांच्या नोंदी असलेल्या हस्तलिखित प्रतिमा आढळल्या होत्या. त्यांनी सांगितले, की न्यायालयाने यापूर्वी ३० मे रोजी सीबीआयला आरोपीचे हस्ताक्षर नमुने घेण्याची परवानगी दिली होती. मात्र, या प्रकरणातील नोंदी मोठ्या प्रमाणात असल्याने प्रत्येक दस्तऐवजाची योग्य पद्धतीने तुलना करण्यासाठी आणि निष्पक्ष तपासासाठी आरोपीचे आणखी हस्ताक्षर किंवा स्वाक्षरीचे नमुने आवश्यक आहेत, असे सरकारी वकिलांनी म्हटले.
बुधवारी दिलेल्या आदेशात न्यायालयाने म्हटले, ‘सीबीआयला आरोपी मनीषा संजय हवालदार हिचे अतिरिक्त हस्ताक्षर/स्वाक्षरीचे नमुने संबंधित कारागृहात घेण्याची परवानगी देण्यात येत आहे.’ या प्रकरणात तपास यंत्रणेने १३ आरोपींना अटक केली असून, ते सर्व न्यायालयीन कोठडीत आहेत.
वैद्यकीय प्रवेशांसाठी तीन मे रोजी घेण्यात आलेली ‘नीट’ परीक्षा पेपरफुटीनंतर राष्ट्रीय परीक्षा संस्थेने १२ मे रोजी रद्द केली होती. यानंतर २१ जून रोजी फेरपरीक्षा घेण्यात आली.