‘गांधी स्मृती’वर अभिवादन

महाराष्ट्र टाइम्स
‘गांधी स्मृती’वर अभिवादन
(फोटो- महाराष्ट्र टाइम्स)
मध्य दिल्लीत गेल्या चार दिवसांपासून सुरू असलेला गोंधळ, अस्वस्थता आणि अशांततेला गुरुवारी रात्री नवे वळण मिळाले. लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली अनेक विरोधी पक्षीय खासदार एका बसमधून अचानक गांधी स्मृती येथे पोहोचले. मात्र, त्यांना तिथे पोहोण्यापूर्वी पोलिसांनी उभारलेल्या अडथळ्यांचा सामना करावा लागला.

ज्या ठिकाणी ३० जानेवारी १९४८ रोजी महात्मा गांधीजींची हत्या झाली त्या स्मृती स्तंभाजवळ विरोधी खासदारांनी मोबाइलच्या विजेऱ्या लावून आदरांजली वाहत राष्ट्रगीताचे गायन केले. तेथे जाताना राहुल गांधी यांनी संविधानाची प्रत हाती घेतली होती. विरोधी पक्षाच्या खासदारांनी या ठिकाणी प्रतिकात्मक मूक आंदोलन केले. राहुल गांधी व इतर खासदार एका बसमधून गांधी स्मृती येथे जाण्यासाठी निघाले. सुनहरी बाग लेन येथील गांधी यांच्या निवासस्थानापासून सायंकाळी ७च्या सुमारास एका बसमध्ये सर्व खासदार निघाले. तेथे मोठ्या संख्येने काँग्रेस समर्थकही घोषणाबाजी करत जमले होते. सुनहरी बाग लेन रस्ता जेमतेम १०० मीटर पुढे कृष्ण मेनन मार्गाला जेथे मिळतो त्याच ठिकाणी गृहमंत्री अमित शहा यांचे निवासस्थान आहे. विरोधी खासदारांनी अचानक त्या मार्गाने जाण्याचा प्रयत्न करताच सुरक्षा यंत्रणेची पुन्हा प्रचंड धावपळ उडाली. हजारो सुरक्षा दलांचे जवान बंदोबस्तासाठी तेथे हर होते. पोलिसांनी प्रथम बॅरिकेड्स लावून विरोधी खासदारांच्या बससमोर दुसरी बस उभी केली व जवळपास अर्धा तास ही बस अडवून धरली. यानंतर काँग्रेस समर्थकांनी घोषणाबाजी सुरू केली. त्यानंतर या साऱ्यांना गांधी स्मृतीकडे जाण्याची परवानगी मिळाली.