Heavy Rainfall In Gujarat Saves The Memories Of 1200 People
गुजरातमध्ये मुसळधार; १२०० जणांची सुटका
महाराष्ट्र टाइम्स.कॉम•
दक्षिण गुजरातमध्ये मुसळधार पावसाने कहर केला असून वलसाड, नवसारी, सुरत आणि तापी जिल्ह्यांतील पूरग्रस्त भागांतून आतापर्यंत सुमारे १२०० नागरिकांची सुटका करण्यात आली आहे. सुरतमधील १५०० रहिवाशांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आले असून नवसारी जिल्ह्यात कावेरी नदीच्या वाढलेल्या पाणीपातळीमुळे ११ गावांत अडकलेल्या २०० नागरिकांना बचाव पथकांनी बाहेर काढले. तापी जिल्ह्यात पावसाशी संबंधित एका मृत्यूची नोंद झाली आहे.
वलसाड जिल्ह्यातील उंबरगाव तालुक्यात बुधवारी सकाळी ६ ते गुरुवारी सकाळी १० या अवघ्या १६ तासांत तब्बल ११०० मिमीहून अधिक पावसाची नोंद झाली. जिल्ह्यातील अन्य अनेक तालुक्यांतही ६०० मिमीपेक्षा अधिक पाऊस झाला आहे.राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल (एनडीआरएफ), राज्य आपत्ती प्रतिसाद दल (एसडीआरएफ), भारतीय हवाई दल (आयएएफ) आणि तटरक्षक दलाला सतर्क ठेवण्यात आले आहे.
पावसामुळे राज्यातील ३०० हून अधिक रस्ते तात्पुरते बंद करण्यात आले असून अनेक भागांत वीजपुरवठाही खंडित झाला आहे. सुरतमध्ये एनडीआरएफची दोन व एसडीआरएफची पाच पथके, तर वलसाडमध्ये एनडीआरएफची दोन व एसडीआरएफची चार पथके तैनात आहेत. नवसारीसाठी अतिरिक्त एनडीआरएफ व एसडीआरएफ पथके पाठवण्यात आली असून अमरेली, जुनागढ आणि भावनगर येथेही पथके सज्ज ठेवण्यात आली आहेत. सुरत आणि अहमदाबाद येथेही पूरस्थिती निर्माण झाली आहे.