‘नीट पेपरफुटी प्रकरणातील आरोपींना शिक्षा देण्यासाठी जलदगती न्यायालयाची स्थापना केली जाईल, ही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घोषणा दिशाभूल करणारी असून याबाबत केवळ मलमपट्टी करू नये’, अशी टीका काँग्रेसने सरकारवर केली.
काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी संसदेत सरकारला धारेवर धरले. ‘पंतप्रधानांची घोषणा खूप तोकडी आणि दिशाभूल करणारी असून सरकारने गेल्या १२ वर्षांत पेपरफुटीच्या अनेक घटना दडपल्या. पब्लिक एक्झामिनेशन (प्रीव्हेन्शन ऑफ अनफेअर मीन्स) हा २०२४चा कायदा पेपरफुटी रोखण्यासाठी अपुरा आहे. सबब सरकारने याबाबत नुसती मलमपट्टी करू नये’, अशा शब्दांत खर्गे यांनी सरकारला सुनावले. सीजीपेची संस्थापक अभिजित दीपके यांची गुरुवारी प्रकृती बिघडली. त्याबाबत त्यांनी इन्स्टाग्रामवर माहिती दिली. विश्रांतीनंतर ते आंदोलनस्थळी दाखल झाले. जंतरमंतर परिसरात आंदोलकांच्या हल्ल्यात एक निरीक्षक आणि एक हेड कॉन्स्टेबल जखमी झाल्याचा दावा दिल्ली पोलिसांनी गुरुवारी केला. ‘बुधवारी रात्री १०० ते १५० जणांच्या जमावाने मला घेरून लाठ्याकाठ्या, दगड आणि धारदार वस्तूंनी माझ्यावर हल्ला केला. त्यावेळी मी गणवेशात होतो,’ असे निरीक्षक नंद किशोर सिंह यांनी सांगितले. तर ‘संसद मार्गावर काळा टी-शर्ट घातलेल्या एका उंच व्यक्तीने धारदार शस्त्राने माझ्यावर पाठीमागून वार केला. त्यामुळे प्रचंड रक्तस्राव झाला,’ असे हेड कॉन्स्टेबल बलराम म्हणाले.