Strong Debate In Parliament Over Police Baton Charge On Students Ruling And Opposition Face to face
सत्ताधारी-विरोधक आले आमनेसामने
महाराष्ट्र टाइम्स•
(फोटो- महाराष्ट्र टाइम्स)
जंतरमंतरवर विद्यार्थ्यांवर झालेल्या लाठीमाराचा निषेध करण्याासाठी विरोधी पक्षांनी गुरुवारी संसद परिसरात निदर्शने केली. मात्र, संसदेच्या मकरद्वारावर त्यांच्यासमोर भाजपप्रणित आघाडीचेही (एनडीए) खासदार उतरले. आमनेसामने आलेले सत्तारूढ एनडीए आणि विरोधी पक्षांच्या खासदारांमध्ये जोरदार घोषणायुध्द झाले. तर या मुद्द्यावरून संसदीय चर्चेचा तिढा न सुटल्याने संसदेच्या दोन्ही सभागृहांत सलग चौथ्या दिवशी कामकाज ठप्प पडले. आता आज, शुक्रवारी साप्ताहिक संसदीय कामकाजाचा अखेरचा दिवस असल्याने कामकाज कितपत चालेल याबद्दल शंका आहे.
संसदेतील दोन्ही बाजूंच्या खासदारांनी एकाच वेळी मकरद्वारावर येऊन घोषणाबाजी करत अचानक आंदोलन सुरू केल्याने सुरक्षा यंत्रणेची प्रचंड धावपळ उडाली. दोन्ही बाजूंच्या खासदारांमधील वाढता तणाव लक्षात घेऊन, सुरक्षा कर्मचाऱ्यांनी दोन्ही गटांना वेगळे करण्यासाठी मानवी साखळी तयार केली. नंतर एनडीए खासदार आत गेल्याने तणाव वाढण्याआधीच निवळला.मकरद्वाराजवळ काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे, काँग्रेस संसदीय पक्षाच्या अध्यक्षा सोनिया गांधी, लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी, काँग्रेसचे सरचिटणीस के. सी. वेणुगोपाल, प्रियांका गांधी, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या सुप्रिया सुळे, शिवसेनेचे अरविंद सावंत आणि समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांच्यासह इंडिया आघाडीतील अनेक पक्षनेते या आंदोलनात सामील झाले.
खर्गे यांनी संसदीय चर्चेबाबतचे पंतप्रधानांचे ताजे वक्तव्य चिथावणीखोर असल्याची टीका केली. ते म्हणाले की, ‘सरकारची इच्छा असती तर या विषयावर पहिल्याच दिवशी सभागृहात चर्चा झाली असती, पण त्याऐवजी विद्यार्थ्यांवर क्रूर लाठीमार करण्यात आला आणि अनेक विद्यार्थी गंभीर अवस्थेत रुग्णालयात दाखल आहेत. आता शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यानंतरच संसदेत चर्चा होईल’. भाजपने गुरुवारी विरोधी खासदारांसाठी संसदेचे दरवाजे बंद केल्याचा आरोप करून खर्गे म्हणाले, ‘मोदी या गंभीर विषयावर बराच काळ गप्प राहिले आणि आज त्यांनी अचानक ट्विट केले की याची चौकशी जलगती न्यायालयातर्फे होईल. सध्याच्या परिस्थितीसाठी पंतप्रधान मोदीच जबाबदार असून ते अप्रत्यक्षपणे आपल्याच खासदारांना विद्यार्थी आंदोलना विरोधात संघटित करत आहेत’.
राहुल गांधी यांचे प्रत्युत्तर
राहुल गांधी यांनी पंतप्रधानांच्या ट्विटला जोरदार प्रत्युत्तर दिले. ते म्हणाले की, ‘पंतप्रधानांनी देशातील तरुणांच्या भविष्याला सर्वात मोठे नुकसान पोहोचवले आहे. त्यांनी केवळ देशाची शिक्षण व्यवस्था उद्ध्वस्त होऊ दिली नाही, तर त्यासाठी जबाबदार असलेल्यांचे संरक्षणही केले.पंतप्रधानांनी धर्मेंद्र प्रधान यांना तात्काळ त्यांच्या पदावरून हटवावे आणि विद्यार्थ्यांची माफी मागावी. विद्यार्थ्यांवर हिंसाचार करणाऱ्यांवर कारवाई करावी’.
गीतांजली अंग्मो यांची नाराजी
‘काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निवासस्थानाबाहेर आंदोलन करण्याऐवजी जंतरमंतरवर विद्यार्थ्यांसोबत सहभागी व्हायला हवे होते. त्यांचे आंदोलन अप्रामाणिक वाटते,’ अशी टीका सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांच्या पत्नी गीतांजली अंग्मो यांनी एका मुलाखतीत केली. ‘राजकीय नेते सोनम वांगचुक यांच्या प्रतिमेचा फायदा घेण्याचा प्रयत्न करत आहेत. मात्र, जनता आता त्यास बळी पडणार नाही,’ असे त्या म्हणाल्या.