देशभरात आज एल्गार

महाराष्ट्र टाइम्स
देशभरात आज एल्गार
(फोटो- महाराष्ट्र टाइम्स)
केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी जंतरमंतरवर सुरू असलेल्या आंदोलनाने आता देशव्यापी स्वरूप धारण केले आहे. आंदोलनाची व्याप्ती वाढवत कॉक्रोच जनता पक्षाने आज, शुक्रवारी देशातील प्रत्येक जिल्ह्यात शांततापूर्ण आंदोलन करण्याची घोषणा केली आहे. ‘प्रत्येक जिल्हा, एक दिवस, एक मागणी’ या घोषवाक्यासह विद्यार्थी, पालक आणि नागरिकांना मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

कॉक्रोच जनता पक्षातर्फे जारी करण्यात आलेल्या प्रसिद्धीपत्रकानुसार शुक्रवारचे आंदोलन विद्यार्थ्यांच्या मागण्यांना पाठिंबा देण्यासाठी आणि आंदोलनात पोलिस अत्याचारांच्या पीडित विद्यार्थ्यांशी एकजूट व्यक्त करण्यासाठी आयोजित केले आहे. पक्षाने विद्यार्थी संघटना आणि इतर सामाजिक संघटनांना आंदोलन आयोजित करण्यास, प्रशासनाकडून परवानगी घेण्यास आणि सर्व आवश्यक तयारी करण्यास सांगितले आहे. आंदोलनादरम्यान विद्यार्थ्यांच्या मागण्या जाहीरपणे वाचून दाखवल्या जातील आणि त्यांची मते शांततेने व्यक्त केली जातील. या आंदोलनासाठी कॉक्रोच जनता पक्षातर्फे सविस्तर मार्गदर्शक सूचना, प्रचारात्मक साहित्य आणि निवेदनाचा मसुदा या पोस्टरद्वारे प्रसिद्ध करण्यात आला आहे. सीजेपीच्या मते, २४ जुलै रोजी होणारे हे देशव्यापी आंदोलन विद्यार्थ्यांच्या समस्या आणि पोलिसांच्या कथित कारवाईविरोधात एकजुटीचा संदेश देईल. आंदोलक आणि आयोजकांसाठी मार्गदर्शक सूचना जारी करण्यात आल्या असून, सर्व विद्यार्थी संघटना आणि इतर नागरी समाज संघटनांनी स्थानिक पातळीवर समन्वय साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
मेट्रो पुन्हा बंद

या आंदोलनात विद्यार्थी व पालकांनी जंतरमंतरवर येऊ नये यासाठी मध्य दिल्लीतील १६ मेट्रो स्थानके गुरूवारी सलग दुसऱ्या दिवशीही बंद ठेवण्यात आली होती. ऐन वर्दळीच्या वेळी मेट्रो स्थानके सकाळच्या वेळीच बंद केल्याने हजारो सरकारी कर्मचारी व चाकरमान्यांचे पुन्हा प्रचंड हाल झाले. मेट्रो स्थानके असी मनमानीपणे बंद करण्याचा मुद्दा सर्वोच्च न्यायालयातही पोहोचला. न्यायालयाने सामान्यांना होणाऱ्या त्रासाबद्दल कठोर भूमिका घेतली. वकिलांना न्यायालयात पोहोचण्यात येणाऱ्या अडचणी लक्षात घेता हजर न राहणाऱ्या वकिलांविरुद्ध कोणतेही प्रतिकूल आदेश पारित करू नयेत अशाही सूचना न्यायाधीशांना देण्यात आल्या आहेत. मात्र पुढील सुनावणी पुढे ढकलण्यात आली आहे. पारशी वर्दळ नसलेली इंद्रप्रस्थ, प्रगती मैदान (सुप्रीम कोर्ट) रामकृष्ण आश्रम मार्ग, दिल्ली गेट, जनपथ यासारख्या अनेक मेट्रो स्थानकांना गुरूवारीही कुलूप लावले गेले होते.