भू-राजकीय तणाव कमी होणे आणि किरकोळ गुंतवणूकदारांचा भक्कम सहभाग यामुळे इक्विटी म्युच्युअल फंडांकडे २८,९७३ कोटी रुपयांची गुंतवणूक जून महिन्यात आकर्षित झाली आहे. मे महिन्याच्या तुलनेत ही वाढ २६.५ टक्के आहे. ही माहिती असोसिएशन ऑफ म्युच्युअल फंड्स इन इंडियाने (ॲम्फी) शुक्रवारी दिली.
इक्विटी फंड योजनांमध्ये इतक्या मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक वाढल्यामुळे या फंडांतील गुंतवणुकीचा निव्वळ ओघ चालू वर्षाच्या पहिल्या सहामाहीत १.८१ लाख कोटी रुपयांवर पोहोचला, जो २०२५च्या याच कालावधीत जमा झालेल्या १.६१ लाख कोटी रुपयांच्या तुलनेत १२ टक्क्यांनी अधिक आहे. ॲम्फीच्या आकडेवारीनुसार जून महिन्यात मासिक एसआयपी योगदान मेमधील ३०,९५४ कोटी रुपयांवरून वाढून ३१,७८१ कोटी रुपयांवर पोहोचले. एकंदरीत, म्युच्युअल फंड उद्योगातून जूनमध्ये ५२,९४९ कोटी रुपये काढले गेले, मे महिन्यात ही जावक ६४,१३१ कोटी रुपये होती. परिणामी, म्युच्युअल फंडांचा मत्तापाया महिनाभरापूर्वीच्या ८१.६ लाख कोटी रुपयांवरून जूनअखेरीस ८२.२२ लाख कोटी रुपयांवर पोहोचला. जून महिन्यात डिव्हिडंड यील्ड फंड आणि इक्विटी-लिंक्ड सेव्हिंग्ज स्कीम्समधून (ईएलएसएस) गुंतवणूकदारांनी मोठ्या प्रमाणावर पैसा काढून घेतल्याचे दिसून आले.
डेट-केंद्रित योजनांतून मे महिन्यात गुंतवणूकदारांनी ९६,९४८ कोटी रुपये काढून घेतले. जूनमध्ये याच श्रेणीतून १.०९ लाख कोटी रुपये काढून घेतले गेले. हे मुख्यत्वे अंदाजित, हंगामी तिमाहीअखेरच्या संस्थात्मक भांडवलाच्या गरजा भागवण्यासाठी अल्ट्रा-शॉर्ट-टर्म श्रेणींमधील मोठ्या प्रमाणातील पूर्ततेमुळे झाले, असे दि वेल्थ कंपनी म्युच्युअल फंडाचे डेट विभागाचे मुख्य गुंतवणूक अधिकारी उमेश शर्मा म्हणाले. लिक्विड फंडाची पूर्तता मेमधील २९,६८१ कोटी रुपयांवरून ४२,२९३ कोटी रुपयांवर पोहोचली, तर ओव्हरनाइट फंडांमधून मेमध्ये १५,५२४ कोटी रुपये काढले गेले. जूनमध्ये या फंडांतून १०,५८० कोटी रुपये काढल्याचे ॲम्फीने अहवालात नमूद केले आहे.