सुब्रोतो चषकाच्या शुल्कावरून नाराजी

महाराष्ट्र टाइम्स
सुब्रोतो चषकाच्या शुल्कावरून नाराजी
(फोटो- महाराष्ट्र टाइम्स)
केंद्र आणि राज्य सरकारच्या मान्यतेने दरवर्षी आयोजित होणाऱ्या प्रतिष्ठित ‘सुब्रोतो मुखर्जी फुटबॉल चषक’ स्पर्धेच्या नोंदणी शुल्कावरून राज्यातील क्रीडा शिक्षक आणि शाळांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे. यंदा स्पर्धेसाठी ऑनलाइन नोंदणीच्या नावाखाली प्रत्येक संघाकडून शुल्क आकारले जात असून, त्यानंतर सुब्रोतो चषकाच्या मुख्य संकेतस्थळावरही स्वतंत्र शुल्क भरावे लागत असल्याने शाळांवर दुहेरी आर्थिक भुर्दंड पडत असल्याचा आरोप क्रीडा शिक्षकांनी केला आहे.

राज्य क्रीडा संचालनालयाच्या पोर्टलवर नोंदणी करताना संघाकडून शुल्क आकारले जात आहे. त्यानंतर सुब्रोतो चषकाच्या अधिकृत संकेतस्थळावर पुन्हा सुमारे दोन हजार रुपये शुल्क भरावे लागत असल्याचे शिक्षकांचे म्हणणे आहे. त्यामुळे एका संघासाठी दोन ते तीन हजार रुपयांपर्यंत खर्च येत असून, अनुदानित, जिल्हा परिषद आणि महापालिका शाळांना हा खर्च परवडणारा नसल्याची तक्रार पुढे येत आहे.
शाळांकडे स्वतंत्र क्रीडा निधी नसताना अशा प्रकारे शुल्क आकारणे अन्यायकारक असल्याचे क्रीडा शिक्षकांचे म्हणणे आहे. शासनाने ही प्रवेश फी पूर्णपणे माफ करावी किंवा कमी करावी, अशी मागणी होत आहे.

दरम्यान, स्पर्धा आयोजन समितीच्या मदत कक्षाकडून शुल्क आकारणीचे समर्थन करण्यात आले आहे.