Madhli Bhinta Short Film Delivers Unique Message Of Preserving Relationships
‘मधली...’मधून नाते जपण्याचा संदेश
महाराष्ट्र टाइम्स•
(फोटो- महाराष्ट्र टाइम्स)
वाढता स्वार्थ, संपत्तीचे वाद आणि अहंकारामुळे ताणल्या जाणाऱ्या कौटुंबिक नातेसंबंधांच्या पार्श्वभूमीवर सकारात्मक संदेश देणारा ‘ मधली भिंत ’ हा लघुपट कल्याण येथील सार्वजनिक वाचनालयात प्रदर्शित करण्यात आला. आर्या फिल्म प्रस्तुत या लघुपटाने उपस्थित प्रेक्षकांना अंतर्मुख करत नातेसंबंध जपण्याचा प्रभावी संदेश दिला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी साहित्यिक व कलाकार भिकू बारस्कर होते. नात्यांमधील दुरावा कमी करण्यासाठी अशा आशयघन कलाकृतींची गरज असल्याचे त्यांनी सांगितले. लेखक-दिग्दर्शक अजय पाटील यांनी हा लघुपट केवळ मनोरंजनासाठी नसून कुटुंब एकत्र ठेवण्याचा आणि सकारात्मक विचारांचा सामाजिक संदेश देणारा असल्याचे स्पष्ट केले.एलईडी स्क्रीनवर प्रदर्शनानंतर प्रेक्षकांनी कथानक, दिग्दर्शन आणि कलाकारांच्या अभिनयाचे कौतुक केले. या कथानकावर पूर्ण लांबीचा चित्रपट तयार व्हावा, अशी अपेक्षाही व्यक्त करण्यात आली. कार्यक्रमाला गणेश भाने, शिवाजी शिंदे, रवींद्र सावंत, सुजाता डांगे, किरण डांगे आणि प्रवीण देशमुख यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.
लघुपटाचे निर्माते अजय यादव आणि राकेश यादव असून कथा, पटकथा, संवाद व दिग्दर्शन अजय पाटील यांचे आहे. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मनीषा साबळे यांनी केले.