‘आविष्कार’ संशोधन परिषदेत यंदा सतीश प्रधान ज्ञानसाधना स्वायत्त महाविद्यालयातील संशोधन प्रकल्प ांची विद्यापीठ स्तरावर दखल घेण्यात आली. महाविद्यालयाचे पाच संशोधन प्रकल्प विद्यापीठ फेरीसाठी पात्र ठरले, तर विद्यापीठ अंतिम फेरीत दोन प्रकल्पांना उत्तेजनार्थ पुरस्कार मिळाला. मुंबई विद्यापीठांतर्गत ‘ठाणे मध्य विभाग’ अर्थात झोन ४ ‘विभागीय विजेता’ म्हणून घोषित होण्यात महाविद्यालयाच्या कामगिरीचा मोलाचा वाटा ठरला.
मुंबई विद्यापीठाच्या कालिना कॅम्पसमधील मराठी भाषा भवन येथे आयोजित समारंभात प्रमुख पाहुणे मकरंद देशपांडे यांच्या हस्ते प्राचार्य डॉ. गणेश भगुरे यांनी हा पुरस्कार स्वीकारला. ‘आविष्कार’ संशोधन परिषद हा उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये संशोधन, नावीन्य आणि वैज्ञानिक दृष्टिकोनास चालना देणारा महत्त्वाचा उपक्रम आहे. मुंबई विद्यापीठांतर्गत ही परिषद मुंबईपासून गुजरात सीमेपर्यंत पसरलेल्या १२ विभागांमध्ये आयोजित केली जाते. मानवशास्त्र, भाषा आणि ललित कला, वाणिज्य, व्यवस्थापन आणि विधी, शुद्ध विज्ञान, कृषी आणि पशुसंवर्धन, अभियांत्रिकी आणि तंत्रज्ञान तसेच वैद्यकीय आणि औषधनिर्माणशास्त्र या विषयांतील संशोधन प्रकल्प परिषदेत सादर केले जातात. पदवी, अभियांत्रिकी, वैद्यकीय, फार्मसी आणि व्यावसायिक महाविद्यालयांतील विद्यार्थी आपले मौलिक संशोधन प्रकल्प सादर करून या परिषदेत सहभागी होतात.