सरळसेवा परीक्षा सुरळीत

महाराष्ट्र टाइम्स
सरळसेवा परीक्षा सुरळीत
(फोटो- महाराष्ट्र टाइम्स)
नवी मुंबई महापालिकेच्या सरळसेवा भरती २०२५-२६ अंतर्गत आयोजित ऑनलाइन स्पर्धा परीक्षा दोन दिवसांच्या नियोजनबद्ध प्रक्रियेनंतर सुरळीत पार पडली. २१ जुलै रोजी तीन सत्रांत आणि २२ जुलै रोजी दोन सत्रांत तीन संवर्गांतील १३ पदांसाठी ही परीक्षा घेण्यात आली. मुंबईतील पवईसह सहा जिल्ह्यांतील १३ परीक्षा केंद्रांवर परीक्षा शिस्तबद्ध पद्धतीने झाली.

महापालिकेच्या सरळसेवा भरती प्रक्रियेसाठी टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेसच्या माध्यमातून सहा संवर्गांतील ३६ पदांसाठी १८ हजार ९३० ऑनलाइन अर्ज प्राप्त झाले होते. परीक्षा सुरळीत पार पडावी यासाठी वर्ग-१ दर्जाचे आठ समन्वय अधिकारी आणि १३ केंद्र निरीक्षक अधिकारी नियुक्त करण्यात आले होते. या अधिकाऱ्यांनी परीक्षेच्या आदल्या दिवशीच केंद्रांची पाहणी करून व्यवस्था तपासली होती.
दुसऱ्या दिवशी सकाळी ९ ते ११ या पहिल्या सत्रात ५८८, तर दुपारी १ ते ३ या दुसऱ्या सत्रात ४२२ उमेदवार परीक्षेला उपस्थित होते. अशा प्रकारे दुसऱ्या दिवशी एकूण १,०१० उमेदवारांनी परीक्षा दिली. परीक्षेदरम्यान कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. ऑनलाइन परीक्षेची गोपनीयता आणि सुरक्षितता कायम राहावी यासाठी केंद्र सरकारच्या मान्यतेने सर्व परीक्षा कक्षांमध्ये मोबाइल जॅमर बसविण्यात आले होते.

भरती प्रक्रिया पारदर्शक, नियमबद्ध आणि गुणवत्तेच्या आधारे राबविण्यात येत असल्याचे आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांनी स्पष्ट केले.