It Stocks Surge Leads To A New High In Stock Market
आयटी समभागांवर तेजी स्वार
महाराष्ट्र टाइम्स.कॉम•
रिलायन्स इंडस्ट्रीज, आयसीआयसीआय बँक आणि एचडीएफसी बँक या मोठ्या कंपन्यांच्या समभागांमधील तेजी आणि सकारात्मक जागतिक संकेतांमुळे शेअर बाजार सलग दुसऱ्या दिवशी, शुक्रवारी वधारले. बीएसई सेन्सेक्स ८२७.५७ अंकांनी उसळून ७७,५६९.३९वर स्थिरावला. दिवसभरात तो ९००.४१ अंकांनी वाढून ७७,६४२.२३वर पोहोचला होता. एनएसई निफ्टी २४४.१० अंकांनी वधारून २४,२०६.९०वर बंद झाला.
बीएसईवर एकूण २,८८३ समभाग वधारले, तर १,३७७ घसरले आणि १७४ समभाग स्थिर राहिले. सेन्सेक्समध्ये रिलायन्स इंडस्ट्रीज, टेक महिंद्रा, भारत इलेक्ट्रॉनिक्स, ॲक्सिस बँक, टाटा स्टील आणि इन्फोसिस यांचे समभाग वधारले. इटर्नल, भारती एअरटेल, सन फार्मा आणि ट्रेंट यांचे समभाग घसरले. जागतिक तेल बाजारात ब्रेण्ट क्रूडचा वायदा दर प्रतिबॅरल ०.३० टक्क्यांनी घसरून ७६.०७ अमेरिकी डॉलरवर आला. बीएसई मिडकॅप सिलेक्ट निर्देशांक १.७४ टक्क्यांनी वधारला आणि स्मॉलकॅप सिलेक्ट निर्देशांक १.०३ टक्क्यांनी वाढला. सर्व क्षेत्रीय निर्देशांक सकारात्मक स्थितीत बंद झाले. स्थावर मालमत्ता ३.४० टक्के, पीएसयू बँक ३.२६ टक्के, मिडस्मॉल प्रायव्हेट बँक्स क्वालिटी टिल्ट २.५६ टक्के, फोकस्ड आयटी २.२९ टक्के, इन्फर्मेशन टेक्नॉलॉजी २.०१ टक्के, धातू १.५५ टक्के आणि सेवा १.५० टक्क्यांनी वधारले.