टेनिसचा अनभिषिक्त सम्राट

Contributed byडॉ. सुवर्णा हितेंद्र देवळाणकर|महाराष्ट्र टाइम्स.कॉम
टेनिसचा अनभिषिक्त सम्राट
गज्जेता होणे हे प्रत्येक खेळाडूचे स्वप्न असते; परंतु त्या शिखरावर दीर्घकाळ टिकून राहणे, सातत्याने नवनवे विक्रम करणे हे फार थोड्या खेळाडूंना जमते. सर्बियाचा महान टेनिसपटू नोव्हाक जोकोविच हा अशाच दुर्मीळ व्यक्तिमत्त्वांपैकी एक आहे. विम्बल्डनमधील १०६वा विजय हा केवळ एका सामन्याचा निकाल नाही; तर दोन दशकांहून अधिक काळ केलेल्या अथक परिश्रमांचा, जिद्दीचा आणि मानसिक सामर्थ्याचा गौरवशाली टप्पा आहे.

जोकोविचने २००३ मध्ये आपल्या व्यावसायिक कारकिर्दीला सुरुवात केली. २००८ मध्ये, वयाच्या विसाव्या वर्षी, त्याने ऑस्ट्रेलियन ओपनमध्ये आपले पहिले मोठे विजेतेपद जिंकून रॉजर फेडरर आणि रफाएल नदाल यांच्या सलग ११ मेजर विजेतेपदांची मालिका खंडित केली. तेव्हापासून फेडरर, नदाल आणि जोकोविच या त्रिकुटाला चाहते आणि समालोचकांमध्ये ‘बिग थ्री’ म्हणून ओळखले जाऊ लागले. फेडररने टेनिसला सौंदर्य आणि सहजता दिली, नदालने जिद्द आणि लढाऊ वृत्तीचे सर्वोच्च उदाहरण घालून दिले, तर जोकोविचने सातत्य, सर्वांगसुंदर खेळ आणि मानसिक कणखरपणाच्या जोरावर या दोघांनाही अनेक विक्रमांमध्ये मागे टाकले. त्यामुळे या तिघांमधील स्पर्धा ही केवळ विजेतेपदांसाठी नव्हती, तर टेनिसच्या इतिहासात सर्वोच्च स्थान मिळविण्यासाठी होती.
जोकोविचच्या नावावर आज पुरुष एकेरीतील २४ ग्रँड स्लॅम विजेतिपदे आहेत. त्याने ऑस्ट्रेलियन ओपन १० वेळा, फ्रेंच ओपन ३ वेळा, विम्बल्डन ७ वेळा आणि यूएस ओपन ४ वेळा जिंकले आहे. एटीपी जागतिक क्रमवारीत तब्बल ४२८ आठवडे अव्वल स्थान पटकावण्याचा सार्वकालीन विक्रमही त्याच्याच नावावर आहे. जोकोविचचे वैशिष्ट्य म्हणजे त्याची सर्वांगीण खेळशैली. त्याची अचूक सर्व्हिस, भेदक बॅकहँड, नेटजवळील चपळाई, बचावातून आक्रमण करण्याची क्षमता आणि सामन्यातील प्रत्येक गुणासाठी शेवटपर्यंत लढण्याची वृत्ती यामुळे तो इतरांपेक्षा वेगळा ठरतो.

त्याचा जीवनप्रवासही तितकाच प्रेरणादायी आहे. युद्धाच्या छायेत असलेल्या सर्बियात त्याचे बालपण गेले. मर्यादित साधने, आर्थिक अडचणी आणि प्रतिकूल परिस्थिती यांवर मात करून त्याने टेनिसची वाट निवडली. लहानपणापासूनच कठोर सराव, शिस्तबद्ध जीवन आणि स्वतःवरील अढळ विश्वास यांच्या बळावर त्याने जागतिक टेनिसमध्ये सर्वोच्च स्थान मिळवले. जोकोविचच्या कारकिर्दीत संघर्षही कमी आले नाहीत. दुखापती, फॉर्ममधील चढ-उतार, २०२० च्या यूएस ओपनमधील अपात्रता आणि करोनाकाळातील करोना लसीबाबतच्या निर्णयामुळे त्याला अनेक टीका आणि काही महत्त्वाच्या स्पर्धांना मुकावे लागले. परंतु, प्रत्येक संकटानंतर तो अधिक परिपक्व, अधिक सक्षम आणि अधिक निर्धाराने कोर्टवर परतला.

जोकोविचच्या कारकिर्दीतील आणखी एक सुवर्णअध्याय म्हणजे २०२४ च्या पॅरिस ऑलिम्पिकमधील सुवर्णपदक. २००८ च्या बीजिंग ऑलिम्पिकपासून २०२४ च्या पॅरिस ऑलिम्पिकपर्यंत त्याने सलग पाच ऑलिंपिक स्पर्धांमध्ये सर्बियाचे प्रतिनिधित्व केले. तब्बल सोळा वर्षे जागतिक टेनिसच्या सर्वोच्च स्तरावर सातत्यपूर्ण कामगिरी करत ऑलिम्पिकमध्ये स्थान कायम राखणे, हे कोणत्याही खेळाडूसाठी अत्यंत कठीण आव्हान असते. या प्रदीर्घ प्रवासात त्याने २००८ मध्ये कांस्यपदक, तर २०२४ मध्ये सुवर्णपदक जिंकत आपल्या ऑलिम्पिक कारकिर्दीला पूर्णत्व दिले. २०२४ च्या पॅरिस ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदक जिंकून नोव्हाक जोकोविचने आपल्या कारकिर्दीतील एकमेव उर्वरित मोठे स्वप्नही साकार केले. त्यामुळे चारही ग्रँड स्लॅम, ऑलिम्पिक सुवर्णपदक, एटीपी फायनल्स आणि सर्व नऊ एटीपी मास्टर्स १००० स्पर्धा जिंकणारा तो इतिहासातील पहिला पुरुष टेनिसपटू ठरला. ही कामगिरी त्याच्या सर्वांगीण उत्कृष्टतेची आणि अद्वितीय सातत्याची साक्ष देणारी आहे. गेल्या रविवारी रशियाच्या रोमन सॅफियुलिनविरुद्ध ७-६ (८-६), ६-३, ३-६, ६-३ असा विजय मिळवत जोकोविचने विम्बल्डनमध्ये १०६वा ऐतिहासिक विजय नोंदवला. पहिल्या सेटमध्ये पिछाडीवर असतानाही त्याने अनुभव, संयम आणि चिकाटीच्या जोरावर दमदार पुनरागमन केले. या विजयासह त्याने पुरुष एकेरीत विम्बल्डनमधील सर्वाधिक विजयांचा रॉजर फेडररचा विक्रम मागे टाकत इतिहासात आणखी एक सुवर्णअध्याय लिहिला.

विम्बल्डन ग्रँडस्लॅम टेनिस स्पर्धेत आपला १०६ वा विजय नोंदवत असतानाच जोकोविचला या वेळी विजेतेपद मिळवून रॉजर फेडररच्या आठ विम्बल्डन विजेतेपदांच्या विक्रमाशी बरोबरी करायची आहे. यासोबतच तो आपल्या कारकिर्दीतील २५ वे ग्रँड स्लॅम विजेतेपद जिंकण्याच्याही जवळ आहे.

विम्बल्डनच्या इतिहासात पुरुष आणि महिला या दोन्ही गटांचा विचार केला असता, महान टेनिसपटू मार्टिना नवरातिलोवा यांच्या नावावर १२० विजयांचा सार्वकालीन विक्रम आहे. १०६ विजयांसह जोकोविच आता त्या शिखराच्या दिशेने वेगाने वाटचाल करीत आहे. त्याचा सध्याचा फॉर्म, तंदुरुस्ती, अनुभव आणि जिंकण्याची प्रबळ इच्छा पाहता हा विक्रमही भविष्यात त्याच्या आवाक्यात येऊ शकतो हे निश्चित.

जोकोविचच्या उल्लेखनीय कामगिरीची जागतिक स्तरावर दखल घेण्यात आली आहे. त्याला २०१२, २०१५, २०१६, २०१९ आणि २०२४ मध्ये पाच वेळा ‘लॉरियस वर्ल्ड स्पोर्ट्समन ऑफ दी इयर’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले असून, हा विक्रम त्याने रॉजर फेडररसोबत संयुक्तपणे प्रस्थापित केला आहे. तसेच ‘टाइम’ मासिकाने त्याची जगातील १०० प्रभावशाली व्यक्तींमध्ये, तर ‘फोर्ब्स’ने जगातील अव्वल दहा सर्वाधिक मानधन घेणाऱ्या खेळाडूंमध्ये निवड केली आहे. आजची युवा पिढी जोकोविचकडे केवळ महान टेनिसपटू म्हणून पाहत नाही, तर संकटांवर मात करून ध्येय गाठणारा आदर्श म्हणून पाहते. भारतीय खेळाडूंनाही त्याच्या जीवनातून सातत्य, कठोर परिश्रम, मानसिक ताकद आणि खेळाप्रती समर्पण यांचा अमूल्य संदेश मिळतो. प्रतिभा महत्त्वाची असतेच; परंतु त्या प्रतिभेला जागतिक यशात रूपांतरित करण्यासाठी लागणारी शिस्त, संयम आणि चिकाटी अधिक महत्त्वाची असते, हे जोकोविचने आपल्या कारकिर्दीतून सिद्ध करून दाखवले आहे.

(लेखिका सेंट मीरा महाविद्यालय, पुणे येथे उपप्राचार्य व शारीरिक शिक्षण शिक्षिका आहेत.)