Contributed by: प्रा. डॉ. प्रकाश खांडगे|महाराष्ट्र टाइम्स.कॉम•
शीच्या दशकात संपूर्ण भारतात सांस्कृतिक विकेंद्रीकरणाचे वारे वाहू लागले होते. तत्कालीन पंतप्रधान राजीव गांधी यांच्या संकल्पनेतून आदिवासी वाड्यापाड्यांतील लोककलावंत महानगरांच्या माध्यमातून संस्कृतीच्या मुख्य प्रवाहात येऊ लागले. याच काळात ‘अपना उत्सव’ आणि ‘भारत महोत्सवा’च्या माध्यमांतून भारतीय लोककलांचा डंका जगभरात वाजला. या सांस्कृतिक चळवळीत छत्तीसगडच्या पारधी समाजातील तीजनबाई हे नाव मोठ्या आदराने घेतले जाऊ लागले आणि ‘ पंडवानी म्हटले की तीजनबाई’ असे एक समीकरणच रूढ झाले.
द्रौपदी स्वयंवर, सुभद्राहरण, द्रौपदी वस्त्रहरण अशा महाभारतातील कथा तीजनबाई आपल्या छत्तीसगढी बोलीत अशा काही रंगवून सांगायच्या की, भरतमुनींच्या नाट्यशास्त्राचे रसनिर्मितीचे सगळे सिद्धान्त तिथे उलटे-पालटे व्हावेत. गायन, वादन आणि अभिनय यांचा त्रिवेणी संगम म्हणजेच तीजनबाईंची पंडवानी!रामायण, महाभारतासारख्या महाकाव्यांच्या गाथागायनाची परंपरा छत्तीसगडमध्ये अतिशय पुरातन आहे. सबलसिंग चौहान यांनी रचलेल्या महाभारताचा आधार घेत पंडवानी छत्तीसगढी बोलीत सादर केली जाते. ही केवळ कथा किंवा गाथागायन नसून त्यासोबत अभिनयाचे सप्तरंगी इंद्रधनुष्य यात पाहायला मिळते. हात, चेहरा आणि डोळे यांच्या वैविध्यपूर्ण हालचालींतून नाट्यसृजनाची अनोखी सृष्टी इथे उभी राहते.
पंडवानीचे सादरीकरण प्रामुख्याने दोन शैलींमध्ये विभागलेले आहे. एक आहे वेदमती शैली. या शैलीमध्ये कलाकार गुडघ्यावर बसून पारंपरिक पद्धतीने महाभारतातील पौराणिक कथांचे गायन करतो. झाडूराम देवांगन, पुनाराम निषाद आणि रितू वर्मा हे या शैलीचे प्रमुख प्रतिनिधी आहेत. दुसरी आहे कापालिक शैली. ‘कापालिक’ म्हणजे बोलीभाषेतील ‘काल्पनिक’. यात मूळ कथेचा धागा आणि पात्रांची भूमिका बदलत नाही, मात्र पात्रांचे स्वभावदर्शन घडविताना गायक आपल्या कल्पनेचे रंग भरतो आणि समकालीन संदर्भ जोडतो. तीजनबाई आणि त्यांच्या शिष्या प्रभा चेलक या कापालिक शैलीच्या खंद्या प्रतिनिधी आहेत.
तीजनबाईंचा जन्म १९५६ साली छत्तीसगडमधील दुर्ग जिल्ह्यातील अटारी-पाटन येथे बहेलिया (पारधी) जमातीत झाला. कुटुंबाची आर्थिक स्थिती अत्यंत हलाखीची होती. जंगलातून खजुराची पाने गोळा करून त्याचे झाडू आणि चटया बनविणे हे त्यांचे मुख्य काम होते. तीजनबाईंचे वडील छनूकलाल वेळूची बासरी वाजवायचे आणि आई सुखवती त्यावर गाणी गायची. हाच संगीताचा वारसा तीजनबाईंमध्ये उतरला.
त्यांचे आजोबा ब्रिजलाल पारधी यांच्या मार्गदर्शनाखाली तीजनबाईंनी पंडवानी शिकण्यास सुरुवात केली. आजोबांच्या श्रवणसंस्कारातून त्यांना महाभारताचे १८ पर्व मुखोद्गत झाले. आजोबांच्या एकतारीची तार तुटल्यावर, बालवयातच तीजनबाईंनी रायपूरच्या बाजारातून तीन रूपयांच्या तारा विकत आणल्या आणि त्यातूनच त्यांच्या प्रसिद्ध ‘तमुरा’ (तंबोरा) चा जन्म झाला. वयाच्या अवघ्या तेराव्या वर्षी त्यांनी चंदखुरी गावी गॅसच्या बत्त्या आणि मशालींच्या प्रकाशात त्यांनी आपले पहिले सादरीकरण केले. तिथल्या जमीनदाराने प्रभावित होऊन हा कार्यक्रम तब्बल १८ दिवस चालवला.
तीजनबाईंचा जीवनप्रवास अत्यंत संघर्षाचा राहिला. बालविवाह झालेला असतानाच, पुढे गनियारी गावातील तुकाराम वर्मा यांच्याशी त्यांचा स्नेह जडला आणि त्यांनी विवाह केला. परंतु, तुकारामला तीजनबाईंचे गल्लोगल्ली तंबोरा घेऊन गाणे अजिबात मान्य नव्हते. एका कार्यक्रमादरम्यान तुकारामने स्टेजवरच तीजनबाईंना मारहाण केली आणि तंबोऱ्याला हात न लावण्याची धमकी दिली. ‘पंडवानी माझे जीवन आहे, माझा श्वास आहे; मी ती सोडणार नाही!’ असे ठामपणे सांगत तीजनबाईंनी आपल्या तीन मुलांसह पतीचे घर सोडले. त्यांनी चंदखुरीमध्ये झोपडी बांधून झाडू विणण्याचे काम पुन्हा सुरू केले आणि आपली पंडवानी जिवंत ठेवली. एक वेळ अशीही होती की, साथीदार आणि मुलांच्या उदरनिर्वाहासाठी त्यांना प्रचंड हालअपेष्टा सहन कराव्या लागल्या. मुलांना पेज पाजून त्या कार्यक्रमांना जात असत. पुढे त्यांच्या कौसल नावाच्या लहान मुलाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला. त्यांनी आपल्या भावालाही बालपणातच एका साथीच्या रोगात गमावले होते. या सर्व कौटुंबिक आणि सामाजिक अस्मानी-सुलतानी संकटांवर मात करत त्यांनी तंबोऱ्याची साथ कधीही सोडली नाही.
रागी उमेदसिंह देशमुख (हुंकार देणारे साथीदार), अघनुराम निर्मलकर (ढोलक), गैंदू (हार्मोनिअम) अशा साथीदारांच्या जोरावर तीजनबाईंनी गावोगावी कार्यक्रम गाजवायला सुरुवात केली. १९७१-७२ मधील भिलाई महोत्सवात त्यांच्या कलेची कीर्ती सर्वदूर पसरली. पुढे खैरागड विद्यापीठ, भोपाळचे भारत भवन आणि दिल्लीच्या अशोका हॉटेलमध्ये त्यांच्या कार्यक्रमांना मोठी पसंती मिळाली.
त्यांच्या आयुष्याला सर्वांत मोठे वळण मिळाले १९८५ मध्ये, जेव्हा त्यांना पॅरिस येथील ‘भारत महोत्सवा’त पंडवानी सादर करण्याची संधी मिळाली. छत्तीसगडच्या आदिवासी पाड्यातील एका उपेक्षित समाजातून आलेल्या तीजनबाईंनी आपल्या अस्सल लोककलेच्या जोरावर थेट आंतरराष्ट्रीय मंचावर झेप घेतली. भाषा समजत नसतानाही परदेशी प्रेक्षक त्यांच्या आंगिक आणि वाचिक अभिनयाने मंत्रमुग्ध झाले.
पंडवानी ही केवळ मनोरंजनाची गाथा नसून, ती मानवी जीवनमूल्यांची आणि असत्यावर सत्याच्या विजयाची कथा आहे, असे तीजनबाई मानत. महाभारतातील स्त्री पात्रांबद्दल बोलताना पुरुषप्रधान संस्कृतीतील ‘नारी दमन’ त्या मोठ्या पोटतिडकीने मांडत. त्यांच्या हातात स्त्री-मुक्तीचा कोणताही आधुनिक झेंडा नसला, तरी पंडवानीच्या पताक्याद्वारे त्या सातत्याने स्त्रीशक्तीचा जागर घडवत आल्या.
भारतातील लोककलावंतांना सर्वोच्च नागरी सन्मान मिळणे दुर्मीळ मानले जाते, परंतु तीजनबाईंच्या अद्वितीय योगदानासाठी त्यांना ‘पद्मविभूषण’ या सर्वोच्च बहुमानाने सन्मानित करण्यात आले. छत्तीसगडी बोलीला आपल्या आवाजाने आणि अभिनयाने जागतिक दरबारात मानाचे स्थान मिळवून देणाऱ्या तीजनबाई खऱ्या अर्थाने भारतीय लोककलावंतांच्या ‘मुकुटमणी’ठरल्या.
‘अपना उत्सव’च्या काळापासून तीजनबाईंचा आणि माझा दृढ परिचय होता. त्यांचे ‘सुभद्राहरण’ आणि ‘द्रौपदी वस्त्रहरण’ कार्यक्रम मी ध्वनिमुद्रित केले होते. अखिल भारतीय महिला लोककला संमेलन मुंबईला आम्ही आयोजित केले, त्याच्या पहिल्या अध्यक्ष तीजनबाई होत्या. त्यांच्या गावी जाण्याचा आणि त्यांच्याशी मनसोक्त संवाद साधण्याचा योग आला होता. त्या म्हणायच्या, ‘मै गाते गाते बुढी हो गई, आप सुनते सुनाते बुढे हो गये...’ यानंतर त्यांच्या खड्या आवाजातील पंडवानी कधीच ऐकू येणार नाही.