Pumping Process Begins Important Instructions From The Commissioner
आयुक्तांचे निर्देश कामाला आले
महाराष्ट्र टाइम्स•
दुपारी साडेतीन वाजेच्या सुमारास सुरू करण्यात आलेले पंपिंग रात्री साडेआठ वाजेच्या सुमारास बंद करण्यात आले. केवळ पाच तासच पंपिंग करण्यात आले. आता उद्या (शनिवारी) सकाळी पुन्हा पंपिंग सुरू करण्यात येणार आहे. त्यामुळे दुपारच्यानंतर पाणी नक्षत्रवाडी येथील पंपहाउसमध्ये दाखल होईल, अशी माहिती सूत्रांनी दिली .
शुक्रवारी दुपारी बारा वाजेपर्यंत कोणत्याही परिस्थितीत जायकवाडी धरणातून पंपिंग सुरू झालेच पाहिजे, असे महापालिका आयुक्त अमोल येडगे यांनी दिलेले निर्देश अखेर कामाला आहे आहेत. दुपारी साडेतीन वाजेच्या सुमारास पंपिंग सुरू करण्यात आले. रात्री उशिरा पाणी नक्षत्रवाडी येथील पंपहाउसमध्ये दाखल झाले. आयुक्त अमोल येडगे यांनी गुरुवारी पाणीपुरवठा योजनेच्या कामाचा आढावा घेतला आणि शुक्रवारी दुपारपर्यंत कोणत्याही परिस्थितीत पंपिंग सुरू झालेच पाहिजे, असे महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे अधिकारी आणि जीव्हीपीआर कंपनीचे प्रतिनिधी यांना बजावले होते.
शुक्रवारी पत्रकारांशी बोलताना अमोल येडगे म्हणाले, ‘दुपारी साडेतीन वाजता जायकवाडीहून पंपिंग सुरू करण्यात आले आहे. रात्री उशिरापर्यंत पाणी नक्षत्रवाडी येथे दाखल होईल. त्यानंतर शहरासाठी सुमारे तीस एमएलडी पाणी वाढेल. गुरुवारी आढावा घेतला तेव्हा २४ जूनची स्थिती कायम असल्याचे लक्षात आले. २४ जून रोजी नक्षत्रवाडी येथील पंपहाउसला पावसामुळे गळती लागली, त्यामुळे पंपिंग बंद करण्यात आले होते. मुख्य जलवाहिनीवरील पन्नास वॉल्व्ह एक तर दुरुस्त करावे लागतील, नाही तर ते बदलावे लागतील. ते बदलण्याचे कंपनीने मान्य केले आहे. व्हॉल्व्ह बसवण्यासाठी सहा ते सात दिवसांसाठी शटडाउन घ्यावा लागणार आहे. या काळात जुन्या योजनेतून पाणीपुरवठा सुरू राहील, त्यामुळे पाणीपुरवठा विस्कळित होणार नाही, असा दावा त्यांनी केला.