Vehicle Insurance A Key Element Of Customer Safety
‘विमा ही वाहनाची रोगप्रतिकारक शक्ती’
महाराष्ट्र टाइम्स•
(फोटो- महाराष्ट्र टाइम्स)
वाहनखरेदीसाठी किरकोळ स्तरावर वित्तपुरवठा झाल्यास ग्राहक वाहनांच्या दालनातून बाहेर पडताना वाहन घेऊन जाऊ शकतो. त्याचप्रमाणे विमा ही वाहनाची रोगप्रतिकारक शक्ती असल्याने वाहनविम्याचे महत्त्व अनन्यसाधारण आहे, असे मत देशातील वाहन किरकोळ विक्री उद्योगाची शिखर संस्था असलेल्या फेडरेशन ऑफ ऑटोमोबाइल डीलर्स असोसिएशन्स (फाडा) या संघटनेचे अध्यक्ष सी. एस. विघ्नेश्वर यांनी शुक्रवारी मांडले. फाडातर्फे आयोजित पाचव्या वित्त आणि विमा परिषदेत अध्यक्षीय भाषणात त्यांनी हे मत मांडले.
या शिखर परिषदेने देशाच्या बँकिंग, वित्त, विमा आणि वाहन किरकोळ विक्री क्षेत्रातील प्रमुखांना एकत्र आणले आणि वाहन मालकी व डीलरशिपच्या बदलत्या स्वरूपाकडे लक्ष वेधले. डीलर्स, बँकर्स आणि विमादाते यांच्यातील सहकार्यासाठी एक महत्त्वपूर्ण व्यासपीठ म्हणून काम करत या कार्यक्रमाने होलसेल फायनान्स, रिटेल फायनान्स आणि इन्शुरन्स तीन प्रमुख आधारस्तंभांवर लक्ष केंद्रित केले. तसेच वाहन वित्तपुरवठा आणि ग्राहक संरक्षणातील संधी आणि आव्हानांचा शोध घेतला. महाराष्ट्राचे गृहराज्यमंत्री (ग्रामीण) डॉ. पंकज कंचन राजेश भोयर यावेळी उपस्थित होते.