घनकचरा प्रक्रिया प्रकल्पाचे पाऊल पुढे

महाराष्ट्र टाइम्स
घनकचरा प्रक्रिया प्रकल्पाचे पाऊल पुढे
(फोटो- महाराष्ट्र टाइम्स)
शहरात दररोज निर्माण होणाऱ्या किमान ३०० टन सुक्या कचऱ्याच्या संकलन, वाहतूक आणि सिमेंट उद्योगांमध्ये शास्त्रोक्त पद्धतीने प्रक्रियेसाठी सहा कोटी ८३ लाख ६४ हजार रुपयांच्या कंत्राटाला स्थायी समितीने गुरुवारी मान्यता दिली. या प्रस्तावाला काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसने विरोध केल्याने मतदान घेऊन नऊ विरुद्ध चार मतांनी हा प्रस्ताव मंजूर केला.

‘भूमी ग्रीन एनर्जी एनव्हारोकेअर’ या संस्थेला प्रतिटन ८४४ रुपये दराने हे कंत्राट देण्यात आले आहे. रॅम्प, हस्तांतर केंद्र किंवा महापालिकेने निश्चित केलेल्या अन्य ठिकाणांहून रोज किमान ३०० टन सुका कचरा गोळा करून तो सिमेंट उद्योगांपर्यंत पोहोचविणे आणि त्यावर शास्त्रोक्त पद्धतीने प्रक्रिया करणे अपेक्षित आहे. हा करार सहा महिन्यांसाठी असून, गरजेनुसार पुढील तीन महिन्यांची मुदतवाढ देता येणार आहे. या कालावधीत एकूण ८१ हजार टन कचऱ्याची वाहतूक व प्रक्रिया केली जाणार आहे.
पहिल्या टप्प्यात एकच निविदा आल्याने फेरनिविदा मागविण्यात आली. त्यातही फक्त ‘भूमी’चीच एकमेव पात्र निविदा सादर झाली. २५ जून रोजी दरांचा लिफाफा उघडण्यात आला. निविदा समितीने २९ जून रोजी संबंधित दरास मंजुरी दिली.

‘हे काम अत्यावश्यक असल्याचे प्रशासनाने म्हटले होते. एक जुलैपासून काम सुरू करण्यास आणि संबंधित संस्थेशी करार करण्यासाठी स्थायी समितीची मंजुरी मागितली होती. ती मिळाल्यानंतर संस्था कामाला सुरुवात करील,’ असे स्थायी समितीचे अध्यक्ष श्रीनाथ भिमाले यांनी सांगितले.

‘याच कंपनीचा उरुळी देवाची येथील कचरा प्रकल्प नूतनीकरणासाठी बंद केला जाणार असल्याने पुढील नऊ महिन्यांसाठी कंपनीला सध्याच्या डेपोच्या शेजारची जागा तात्पुरती देण्याबाबतचा हा प्रस्ताव गुरुवारी स्थायी समितीच्या बैठकीत चर्चेला आला. त्याला काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस या दोन्ही पक्षांनी विरोध केला. अखेर ९ विरुद्ध ४ मतांनी हा प्रस्ताव मंजूर झाला,’ असे काँग्रेसचे स्थायी समिती सदस्य प्रशांत जगताप यांनी सांगितले.

‘जुन्या प्रकल्पाचे नूतनीकरण होईपर्यंत नवीन तात्पुरत्या प्रकल्पासाठी भूमी ग्रीन कंपनी शेड उभारेल. नवीन मशिनरी घेतली जाईल आणि कालांतराने याच जागेत नवीन कचरा प्रकल्पाचे काम या कंपनीलाच दिले जाईल, अशी खात्री आहे,’ असे जगताप यांनी सांगितले.

घनकचरा प्रक्रिया प्रकल्पाचे पाऊल पुढे