‘बीएलओ म्हणून नियुक्ती रद्द करा’

महाराष्ट्र टाइम्स
demand to cancel appointment of anganwadi workers as blos
बालकांचे पोषण, गर्भवती व स्तनदा मातांची काळजी, आरोग्य आणि शिक्षणाशी संबंधित जबाबदाऱ्या सांभाळणाऱ्या अंगणवाडी सेविकांवर निवडणुकीच्या कामाचा अतिरिक्त भार टाकण्यात आल्याने नाराजी व्यक्त होत आहे. मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (बीएलओ) म्हणून केलेली नियुक्ती तातडीने रद्द करावी, अशी मागणी महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी संघाने केंद्रीय निवडणूक आयोगाकडे केली आहे.

विशेष संक्षिप्त मतदार यादी पुनर्निरीक्षण कार्यक्रमांतर्गत मतदार यादी अद्ययावत करण्याचे काम सुरू आहे. त्यासाठी राज्यातील अनेक अंगणवाडी सेविकांची बीएलओ म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. मात्र, या निर्णयामुळे अंगणवाडीतील मूलभूत सेवा प्रभावित होण्याची भीती संघटनेने व्यक्त केली आहे.
संघटनेच्या म्हणण्यानुसार, प्रत्येक गावात ८०० ते १,००० लोकसंख्येमागे एक अंगणवाडी सेविका कार्यरत असते. बालकांचे पोषण, गर्भवती व स्तनदा मातांचे आरोग्य, लसीकरण, पूर्वप्राथमिक शिक्षण, पोषण अभियान तसेच विविध शासकीय योजनांची अंमलबजावणी अशा अनेक जबाबदाऱ्या त्या पार पाडतात. त्यात मतदार यादी पुनर्निरीक्षणाचे काम सोपवल्यास नियमित सेवांवर परिणाम होऊ शकतो.

बीएलओ नियुक्तीसाठी शासकीय किंवा निमशासकीय कर्मचारी असणे आवश्यक आहे. मात्र, अंगणवाडी सेविका या त्या श्रेणीत येत नसल्याने ही नियुक्ती नियमबाह्य असल्याचा दावा संघटनेने केला आहे. निवडणूक आयोगाने हा निर्णय तातडीने मागे घेऊन अंगणवाडी सेविकांना मूळ सेवांवर लक्ष केंद्रित करण्याची संधी द्यावी, अशी मागणी संघाचे चिटणीस राजेश सिंह यांनी केली.