बहुमजली पार्किंगवर लवकरच कुऱ्हाड

महाराष्ट्र टाइम्स
बहुमजली पार्किंगवर लवकरच कुऱ्हाड
(फोटो- महाराष्ट्र टाइम्स)
पुणे महापालिकेने २००६-०७ च्या दरम्यान छत्रपती संभाजी उद्यानात हे ‘ मेकॅनिकल पार्किंग ’ उभारले होते. त्यासाठी जवळपास अडीच कोटी रुपये खर्च करण्यात आले होते. त्या काळात या पार्किंगसाठी बराच खर्च केला गेला; पण त्या तुलनेत त्याचा फारसा उपयोग झाला नाही. गेल्या काही वर्षांपासून तर हे पार्किंग पूर्ण बंदच राहिले होते. त्यामुळे करदात्यांच्या पैशातून उभारलेल्या या पार्किंगसाठी खर्च केलेले कोट्यवधी रुपये पाण्यात गेले आहेत.

जंगली महाराज रस्त्यावरील छत्रपती संभाजी उद्यानातील पांढरा हत्ती बनलेले ‘मेकॅनिकल पार्किंग’ हटविण्याची प्रक्रिया अखेर पुणे महापालिकेने सुरू केली आहे. अनेक वर्षांपासून दुरुस्तीअभावी बंद असलेले हे पार्किंग धोकादायक बनल्याने ते उतरवण्यासाठी कंत्राटदाराची निवड करण्यात आली असून, त्याला गुरुवारी स्थायी समितीने मंजुरी दिली आहे.
हे बहुमजली ‘मेकनाइज्ड’ पार्किंग गेल्या सात-आठ वर्षांपासून बंद अवस्थेतच आहे. २००७ मध्ये उभारलेले हे पार्किंग आता कालबाह्य व धोकादायकही बनले आहे. त्याची दुरुस्ती करून ते पुन्हा कार्यान्वित करणे आर्थिकदृष्ट्या व्यवहार्य नसल्याने ते पाडण्याचा प्रस्ताव प्रशासनाने तयार केला होता. या प्रस्तावानुसार, ‘मेकॅनिकल पार्किंग’च्या देखभाल-दुरुस्ती आणि संचालनासाठी आवश्यक तांत्रिक कौशल्य असलेले कंत्राटदार उपलब्ध न झाल्याने यंत्रणा निष्क्रिय राहिली.

परिणामी, संपूर्ण सांगाडा धोकादायक बनला असून, त्याचा पुनर्वापर करण्यासाठी लागणारा खर्च संभाव्य उत्पन्नापेक्षा अधिक असल्याने ते आर्थिकदृष्ट्याही व्यवहार्य नसल्याचे प्रशासनाने नमूद केले होते. प्रतिटन २९ हजार रुपयांच्या सर्वांत कमी दराने हे काम कंत्राटदाराला देण्यात आले आहे. हे पार्किंग पाडून झाल्यानंतर त्यातील सर्व साहित्याचा स्वतंत्ररीत्या लिलाव केला जाणार आहे.