सोनम मृत्यूप्रकरणी निष्कर्ष प्रलंबित

महाराष्ट्र टाइम्स
sonam dongre death case preliminary report presented by inquiry committee
ऐरोली येथील राजमाता जिजाऊ रुग्णालयात उपचारादरम्यान औषधाच्या प्रतिकूल प्रतिक्रियेमुळे मृत्यू झालेल्या सोनम डोंगरे प्रकरणातील चौकशी समितीचा प्राथमिक अंतरिम अहवाल महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत सादर करण्यात आला. मात्र, अन्न व औषध प्रशासनाचा संबंधित औषधावरील अहवाल आणि जे. जे. रुग्णालयाचा अंतिम शवविच्छेदन अहवाल प्राप्त झाल्यानंतरच या प्रकरणातील अंतिम निष्कर्ष निश्चित होणार असल्याचे समितीने स्पष्ट केले आहे. त्यामुळे प्राथमिक निष्कर्षात बदल होण्याची शक्यता नाकारता येत नसल्याचे अहवालात नमूद करण्यात आले आहे.

१ जुलै २०२६ रोजी उपचारादरम्यान सोनम डोंगरे आणि रिचा मिश्रा यांना औषधाची प्रतिकूल प्रतिक्रिया झाली होती. त्यात सोनम डोंगरे यांचा मृत्यू झाला. या घटनेसह प्रतिमा पाल आणि यापूर्वी मृत्यू झालेल्या प्रतीक्षा खांडेकर यांच्या प्रकरणांची चौकशी करण्यासाठी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. कैलास पवार यांच्या अध्यक्षतेखाली तज्ज्ञ समिती नेमण्यात आली होती.
समितीने संबंधित डॉक्टर, वैद्यकीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची चौकशी करून उपचार पद्धती, औषध प्रणाली आणि उपलब्ध वैद्यकीय कागदपत्रांचा अभ्यास केला. प्राथमिक अहवालानुसार, प्रतिमा पाल यांना इंजेक्शन आयसॉक्सुप्रिन एचसीएलचा सौम्य, तर रिचा मिश्रा यांना मध्यम स्वरूपाचा दुष्परिणाम झाला होता. दोघींनाही वाचविण्यात यश आले. सोनम यांना इंजेक्शन डेक्सामेथासोन १२ मिग्रॅमची तीव्र प्रतिक्रिया झाल्याचे समितीने नमूद केले आहे.