Tree Pruning Starts From January Municipal Corporations Important Decision
जानेवारीपासूनच वृक्षछाटणी
महाराष्ट्र टाइम्स•
(फोटो- महाराष्ट्र टाइम्स)
अवघ्या काही तासांच्या पावसात ठाणे शहरात हजारो झाडे आणि फांद्या कोसळल्याच्या घटनांनंतर महापालिकेच्या महासभेत सर्वपक्षीय नगरसेवकांनी प्रशासनाला धारेवर धरले. वृक्षपडझडीत एका नागरिकाचा मृत्यू झाला, तर विविध घटनांमध्ये चार जण जखमी झाले. या पार्श्वभूमीवर पुढील वर्षापासून जानेवारी महिन्यापासूनच मान्सूनपूर्व वृक्षछाटणी मोहीम सुरू करण्यात येईल, अशी ग्वाही प्रशासनाने दिली. महापौर शर्मिला पिंपळोलकर यांनी मान्सूनपूर्व सर्व कामे वेळेत पूर्ण करून भविष्यात अशा त्रुटी होणार नाहीत, याची दक्षता घेण्याचे निर्देश दिले.
सोमवार आणि मंगळवार झालेल्या महासभेत नगरसेवकांनी वृक्षपडझड, रस्त्यांवर पाणी साचणे, नालेसफाईतील त्रुटी, धोकादायक वृक्षांकडे दुर्लक्ष आणि अपुरे मनुष्यबळ या मुद्द्यांवर प्रशासनाला जाब विचारला. मान्सूनपूर्व तयारीचे दावे केले जात असताना शहरात अशी परिस्थिती कशी निर्माण झाली, असा सवाल नगरसेवकांनी उपस्थित केला.भाजपचे नगरसेवक सुरेश कांबळे यांनी अनेक वर्षे एकाच विभागात कार्यरत असलेल्या अधिकाऱ्यांमुळे कामकाजावर परिणाम होत असल्याचा आरोप केला. कारवाई झालेल्या अधिकाऱ्यांना कोण पाठीशी घालत आहे, असा सवालही त्यांनी केला. भरत चव्हाण यांनी धोकादायक झाडांबाबत पत्रव्यवहार करूनही प्रशासनाने दुर्लक्ष केल्याची टीका केली. अमित सरैय्या यांनी झाडांच्या मुळांभोवती काँक्रीटीकरण झाल्याने झाडे कमकुवत होत असून, वृक्षछाटणी शास्त्रोक्त पद्धतीने करण्याची मागणी केली.
यंदा पाच ते सात दिवसांत दोन महिन्यांइतका पाऊस आणि वादळी वारे झाल्याने परिस्थिती गंभीर झाली, असे अतिरिक्त आयुक्त संदीप माळवी यांनी सांगितले. वृक्षछाटणी झाली होती; मात्र छाटलेल्या फांद्या आणि कचरा उचलण्यात विलंब झाल्याची कबुली त्यांनी दिली. पुढील वर्षापासून जानेवारीपासूनच वृक्षछाटणी सुरू केली जाईल. तसेच नालेसफाईसाठी निधी, मनुष्यबळ वाढविणे आणि कर्मचाऱ्यांसाठी बायोमेट्रिक प्रणाली लागू करण्याचे नियोजन असल्याचे माळवी यांनी स्पष्ट केले.