खासदार कन्येकडून राजीनाम्याचे स्वागत

महाराष्ट्र टाइम्स.कॉम
allegations against mps daughter celebrating resignation
भुवनेश्वरच्या भाजपच्या खासदार अपराजिता सारंगी यांची कन्या अर्चिता सचिन राहर हिने धर्मेंद्र प्रधान यांनी दिलेल्या मंत्रिपदाच्या राजीनाम्याचा आनंद साजरा करणारी पोस्ट सोशल मीडियावर प्रसारित केल्याने ओडिशा भाजपमध्ये नाराजी पसरली आहे.

अर्चिताने इन्स्टाग्रामवरील एका पोस्टमध्ये राष्ट्रध्वजाच्या पार्श्वभूमीवर प्रधान यांचे छायाचित्र टाकत, ‘नीट पेपरफुटी प्रकरणावरून झालेल्या मोठ्या विद्यार्थी आंदोलनादरम्यान धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा’, असे लिहिले आहे. दुसरीकडे, तिच्या आईसह राज्यातील भाजप नेत्यांनी या प्रकरणी प्रधान यांची पाठराखण केली.
‘प्रत्येकाला आपले मत मांडण्याचा अधिकार आहे. अर्चिता आपल्या वक्तव्यावर ठाम आहे. ती जेन झीचे प्रतिनिधित्व करते व तिने आपले मत मांडले’, असे अपराजिता यांच्या कार्यालयातील सहायक धनेश्वर बारिक यांनी सांगितले. ‘या पोस्टमुळे अपराजिता अडचणीत आल्या आहेत का’, असे विचारले असता, ‘हे तर येणारा काळच ठरवेल’, असे ते म्हणाले. अर्चिताने अन्य एका पोस्टद्वारे आपला पवित्रा स्पष्ट केला. ‘ही पोस्ट डीपींच्या (धर्मेंद्र प्रधान) पीएसाठी आहे. ते माझ्या आईला फोन करून माझी पोस्ट हटवण्याची सूचना करतील. मात्र त्रास करून घेऊ नका. मी माझी पोस्ट मागे घेणार नाही. जय जगन्नाथ! जय हिंद,’ असे तिने दुसऱ्या पोस्टमध्ये लिहिले.

ओडिशातील भाजप नेत्यांनी अर्चिताच्या पोस्टवरून तिच्यावर टीका केली. ‘अपराजिता यांचे आपल्या कुटुंबातील सदस्यांवर नियंत्रण असायला हवे. आपल्या मुलीने प्रधान यांच्याविरोधात प्रतिकूल वक्तव्य केल्याबद्दल त्यांनी ओडिशाची माफी मागायला हवी. एक सुशिक्षित व्यक्ती म्हणून खासदारांच्या मुलीने ओडिशा आणि भारताला मोठे योगदान देणाऱ्या प्रधान यांच्याविरोधात असे वक्तव्य करायला नको होते’, अशी प्रतिक्रिया भाजपचे नेते जगन्नाथ प्रधान यांनी दिली.