Fix Responsibility For Baton Charge On Student Protest Demands Rahul Gandhi
लाठीहल्ल्याची जबाबदारी निश्चित करा
Contributed by: नवी दिल्ली|महाराष्ट्र टाइम्स.कॉम•
‘नीट’ पेपरफुटीविरोधात शांततेने आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर झालेल्या क्रूर लाठीहल्ल्याची जबाबदारी निश्चित करा, अशी मागणी करणारे पत्र लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी गृहमंत्री अमित शहा यांना लिहिले आहे. तसेच, तरुणांविरुद्ध पॅलेट गनसह घातक बळाचा वापर करण्यास त्यांनी मान्यता दिली होती का, अशी विचारणाही केली आहे.
‘या देशातील विद्यार्थी न्याय्य आणि जबाबदार शिक्षणप्रणालीची मागणी करत होते. त्यांचे म्हणणे ऐकून घेण्याऐवजी सुरक्षा दलांनी घातक शस्त्रे आणि अश्रुधुरासह अंदाधुंद बळाचा वापर करून त्यांच्यावर हल्ला केला. त्यात शेकडो जण गंभीर जखमी झाले आहेत. शिवाय पोलिसांनी विद्यार्थिनींना जाणीवपूर्वक लक्ष्य केले’, असे राहुल गांधी यांनी २५ जुलै रोजीच्या आपल्या पत्रात म्हटले आहे. ‘देश उत्तरे मागत आहे’, असेही त्यांनी आपल्या पत्रात म्हटले आहे.कोणत्याही लोकशाहीसाठी शांततापूर्ण आंदोलन अत्यंत महत्त्वाचे आहे आणि आंदोलकांचे संरक्षण करणे तसेच संवादाद्वारे त्यांच्या तक्रारींचे निराकरण करणे ही सरकारची जबाबदारी असल्याचे राहुल यांनी म्हटले आहे. ‘सर्वांत धक्कादायक बाब म्हणजे घातक पॅलेट गनचा वापर. माध्यमे व समाजमाध्यमांवरील वृत्तांतून गंभीर जखमी झालेले लोक स्पष्टपणे दिसत आहेत, त्यात एका पत्रकाराचाही समावेश आहे. मी १९ वर्षांच्या साहिल लोचब या विद्यार्थ्याला भेटलो. पॅलेट गनने गोळी झाडल्यामुळे त्याचा एक डोळा निकामी होण्याची शक्यता आहे’, असे राहुल यांनी पत्रात नमूद केले आहे.
नवी दिल्ली : ‘भाजप कार्यकर्त्यांसाठी देश, तरुण आणि विद्यार्थी हे कोणत्याही पदापेक्षा कितीतरी अधिक महत्त्वाचे आहेत आणि केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा या तत्त्वाचे उदाहरण आहे’, अशी प्रतिक्रिया केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी दिली. ‘मोदी सरकार देशातील तरुणांच्या भावनांचा आदर करते आणि पेपरफुटीविरोधात आवश्यक सुधारणा लागू करण्यासाठी बांधील आहे’, असे त्यांनी शनिवारी रात्री उशिरा ‘एक्स’वरील एका पोस्टमध्ये म्हटले आहे.