अमेरिका-इराण पुन्हा चर्चेच्या वळणावर

Contributed byवॉशिंग्टन|महाराष्ट्र टाइम्स.कॉम
अमेरिका-इराण पुन्हा चर्चेच्या वळणावर
गेल्या दोन आठवड्यांपासून सुरू असलेल्या तीव्र बॉम्बहल्ल्यांनंतर अमेरिकी सैन्याने इराणवरील हवाई हल्ले तात्पुरते थांबवले आहेत. पूर्ण तीव्रतेचे युद्ध टाळण्यासाठी सध्या मुत्सद्दी स्तरावर प्रयत्न वेगाने सुरू आहेत; परंतु गेल्या पाच महिन्यांपासून सुरू असलेला हा संघर्ष खरोखरच शांततेच्या मार्गावर आला आहे की नाही, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी एका बाजूला चर्चा सुरू असल्याचे सांगतानाच दुसऱ्या बाजूला आणखी हल्ले करण्याचा इशाराही दिला आहे. या युद्धामुळे इंधन दर वाढत असून, त्याचा आगामी मध्यावधी निवडणुकांवर परिणाम होण्याची शक्यता वर्तवली जात आहे; मात्र ट्रम्प यांनी ही चिंता फेटाळून लावली आहे. त्यातच इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू पुढील आठवड्यात वॉशिंग्टनला भेट देणार असल्याने या समीकरणांमध्ये अनिश्चितता वाढली आहे.
जगातील २० टक्के तेलाची वाहतूक करणाऱ्या होर्मुझ सामुद्रधुनीवरून मुख्य वाद सुरू आहे. हा व्यापारी मार्ग पुन्हा खुला करण्यासाठी दोन्ही बाजूंमध्ये मध्यस्थांमार्फत चर्चा सुरू आहे. जहाजांच्या वाहतुकीवरील निर्बंध कमी करून तात्पुरत्या युद्धविराम करारावर परतण्याचा दोन्ही देशांचा प्रयत्न असल्याचे एका अधिकाऱ्याने सांगितले.

हुथी बंडखोरांकडून हल्ला

येमेनच्या हुथी बंडखोरांनी सौदी अरेबियावर क्षेपणास्त्रे डागली असून, बाब अल-मंडब सामुद्रधुनी बंद केल्याचा दावा केला आहे. दुसरीकडे, अमेरिकी नौदलाने इराणी बंदरांची नाकेबंदी कायम ठेवली, या नाकेबंदीचे उल्लंघन करणाऱ्या एका जहाजावर कारवाई केली. काळ्या समुद्रातील तणावाच्या पार्श्वभूमीवर, भारताने नागरिकांना सागरी संघर्ष क्षेत्रांत नोकरी स्वीकारण्यापूर्वी सुरक्षेचा काळजीपूर्वक आढावा घेण्याचे आवाहन केले आहे.

अमेरिकेच्या दबावामुळे इराण आता चर्चेबाबत अधिक गंभीर होत असल्याचे ट्रम्प यांनी म्हटले आहे. इराणमधील राजकीय गटबाजी आणि दोन्ही देशांमधील परस्परविरोधी मागण्यांमुळे कराराचा मार्ग खडतर मानला जात आहे. तरीही शांतता प्रस्थापित करण्यासाठी लष्करी दबाव आणि मुत्सद्दी चर्चा एकाचवेळी सुरू राहतील, असे तज्ज्ञांचे मत आहे.