कारगिलच्या रणसंग्रामात मातृभूमीच्या रक्षणासाठी सर्वोच्च बलिदान देणाऱ्या शूर जवानांना राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी रविवारी कारगिल विजय दिनानिमित्त भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली. ‘कारगिलवीरांचे अतुलनीय शौर्य, अढळ निर्धार आणि देशभक्ती ही भारतीय लष्कराच्या गौरवशाली परंपरेची प्रेरणादायी उदाहरणे असून, देश त्यांचा सदैव ऋणी राहील,’ अशी भावना त्यांनी ‘एक्स’वरील पोस्टमध्ये व्यक्त केली.
कारगिलच्या बर्फाच्छादित शिखरांवर पाकिस्तानी सैन्याविरुद्ध भारतीय लष्कराने २६ जुलै १९९९रोजी ‘ऑपरेशन विजय’ यशस्वी झाल्याची घोषणा केली होती. याच्या स्मरणार्थ ‘ कारगिल विजय दिन ’ म्हणून साजरा केला जातो. ‘आपल्या मातृभूमीच्या रक्षणासाठी प्राणांची आहुती देणाऱ्या शूर योद्ध्यांना मी विनम्र श्रद्धांजली अर्पण करते. या जवानांची शौर्यगाथा भावी पिढ्यांना राष्ट्रसेवा, कर्तव्यनिष्ठा आणि देशभक्तीच्या मार्गावर प्रेरणा देत राहील,’ असे त्यांनी म्हटले आहे.