चार भारतीयांचा समावेश असलेल्या एका व्यापारी जहाजावर युक्रेनच्या ओडेसा बंदरात हल्ला झाल्याची घटना घडली आहे. ‘यापैकी दोन भारतीय सुरक्षित असून अन्य दोघांबाबत अद्याप माहिती मिळालेली नाही’, असे कीव्हमधील भारतीय दूतावासाने रविवारी सांगितले.
ही घटना शनिवारी घडली. एमव्ही एजीएन रॅगनार या जहाजावर ओडेसा बंदरात हल्ला झाला. रशिया-युक्रेन संघर्ष सुरू झाल्यापासून वारंवार हल्ल्यांना तोंड देणाऱ्या युक्रेनच्या काळ्या समुद्रातील प्रमुख बंदरांपैकी हे एक बंदर आहे. हा हल्ला झाला त्यावेळी या जहाजात अन्य कर्मचारी व खलाशांसोबत चार भारतीयही होते. अद्याप या चौघांची ओळख पटलेली नाही. ‘या हल्ल्याचा स्रोत, घटनेच्या आजूबाजूची परिस्थिती किंवा जहाजावरील कर्मचारीसंख्येबाबत तत्काळ माहिती मिळाली नाही. सद्यस्थितीत तेथे शोधकार्य व बचावकार्य सुरू असून आम्ही परिस्थितीवर लक्ष ठेवून आहोत’, असेही दूतावासाने म्हटले आहे. रशिया-युक्रेन संघर्षामुळे काळ्या समुद्रात व त्याच्या आसपास तसेच, लगतच्या सागरी क्षेत्रांतील सुरक्षा परिस्थिती अस्थिर आहे. या भागातून जाणाऱ्या व्यापारी जहाजांना क्षेपणास्त्र आणि ड्रोन हल्ल्यांसह मोठ्या हल्ल्यांना सतत तोंड द्यावे लागत आहे.‘युद्धग्रस्त क्षेत्रात कार्यरत असलेल्या किंवा त्या भागातून मार्गक्रमण करणाऱ्या व्यापारी जहाजांवर रोजगार करू इच्छिणाऱ्या भारतीय नागरिकांनी अशी कामे स्वीकारण्यापूर्वी तेथील धोके विचारात घ्यावेत’, असे या मार्गदर्शक सूचनांमध्ये म्हटले आहे.