Technical Conflict Prediction Between Mahametro And Hcmtr In Pune
महामेट्रो-एचसीएमटीआर १२ ठिकाणी आमनेसामने
Contributed by: प्रशांत आहेरPrashant.Aher@timesofindia.com|महाराष्ट्र टाइम्स.कॉम•
सध्या पुण्यात मेट्रो, उड्डाणपूल, रिंग रोड आणि इतर मोठ्या रस्ते प्रकल्पांची कामे एकाच वेळी सुरू आहेत. अशा परिस्थितीत समन्वय न झाल्यास आधी पूर्ण झालेल्या रस्त्यांचे पुन्हा खोदकाम, संरचनात्मक बदल आणि सार्वजनिक पैशांचा मोठा अपव्यय होण्याची भीती महापालिकेने व्यक्त केली आहे. त्यामुळे सुरुवातीपासूनच दोन्ही संस्थांनी संयुक्त तांत्रिक आराखडा निश्चित करण्यावर भर देण्यात आला आहे.
पुणे : पुण्यातील दोन महत्त्वाकांक्षी वाहतूक प्रकल्प असलेले ‘ महामेट्रो ’ आणि ‘उच्च क्षमता सार्वजनिक वाहतूक मार्ग’ ( एचसीएमटीआर ) यांच्यात तब्बल १२ ठिकाणी संभाव्य तांत्रिक संघर्ष (क्रॉसिंग) होण्याची शक्यता समोर आली आहे. भविष्यात कोट्यवधी रुपयांचा अतिरिक्त खर्च, पुन्हा खोदाई आणि प्रकल्पांमध्ये विलंब टाळण्यासाठी महापालिकेने तातडीने ‘महामेट्रो’ला सावध केले आहे.महापालिका आयुक्त नवलकिशोर राम यांनी ‘महामेट्रो’च्या व्यवस्थापकीय संचालकांना पत्र पाठविण्याचा निर्णय घेतला असून, मेट्रोच्या विद्यमान आणि भविष्यातील सर्व मार्गांचे नियोजन करताना ‘एचसीएमटीआर’च्या संरेखन (अलाइनमेंट), उंची आणि वाहतूक आराखड्याचा अनिवार्यपणे विचार करावा, अशा स्पष्ट सूचना दिल्या जाणार आहेत.
१२ ठिकाणी संघर्षाची शक्यता
महापालिकेने २०१८ मध्ये तयार केलेल्या एचसीएमटीआर आराखड्याची अंमलबजावणी आता पुन्हा वेगाने सुरू केली आहे. मात्र, या मार्गावर ‘महामेट्रो’च्या विद्यमान; तसेच प्रस्तावित मार्गांशी १२ ठिकाणी क्रॉसिंग होण्याची शक्यता असल्याचे प्राथमिक अभ्यासातून समोर आले आहे. या ठिकाणी नियोजनात त्रुटी राहिल्यास भविष्यात एखादा प्रकल्प बदलावा लागण्याची शक्यता आहे.
महत्त्वाकांक्षी एचसीएमटीआर
राज्य सरकारने नुकतीच एचसीएमटीआर, भूमिगत बोगदे आणि पुणे इनर रिंग रोडसाठी स्वतंत्र उच्चस्तरीय समिती स्थापन केली आहे. त्यानंतर एचसीएमटीआर प्रकल्पाच्या अंमलबजावणीला वेग आला आहे. सुमारे ३६ किलोमीटर लांबीच्या या मार्गापैकी २१ किलोमीटर विद्यमान रस्त्यांवरून जाणार असून, मेट्रो, बीआरटी, मल्टिमोडल ट्रान्सपोर्ट हब आणि प्रमुख रस्त्यांना जोडणारे हे सर्वांत महत्त्वाचे वाहतूक जाळे असेल.