तब्बल २८ कोटींची रोकड, १५ किलो सोने जप्त

Contributed by: वृत्तसंस्था कोलकाता|महाराष्ट्र टाइम्स.कॉम•
तब्बल २८ कोटींची रोकड, १५ किलो सोने जप्त
पश्चिम बंगालमधील बीरभूम जिल्ह्यात फरारी दगडखाण व्यावसायिक टुल्लू मंडल याच्याशी संबंधित कारवाईत पोलिसांनी २८.५० कोटींची रोकड आणि १५ किलो सोने जप्त केले आहे. या प्रकरणात टुल्लू मंडलचा व्यवस्थापक आणि मेहुणा मिनार मंडल याला गुरुवारी अटक करण्यात आली.

‘रात्रभर सुरू असलेल्या शोधमोहिमेनंतर २८.५० कोटींची रोकड आणि १५ किलो सोने जप्त करण्यात आले. मिनार मंडलला अटक करण्यात आली असून त्याचे घर सील करण्यात आले आहे,’ असे बीरभूमचे पोलिस अधीक्षक व्ही. आर. भुंडेश यांनी सांगितले. अलीकडील काळातील राज्यातील बेकायदा संपत्तीच्या सर्वांत मोठ्या जप्तींपैकी ही एक मानली जात आहे.
दरम्यान, केंद्रीय सुरक्षा दलाच्या बंदोबस्तात पोलिसांचे पथक फरार टुल्लू मंडलच्या निवासस्थानी पोहोचले. तेथेही झडती मोहीम राबविण्यात आली. विधानसभा निवडणुकीचे निकाल मे महिन्यात जाहीर झाल्यापासून टुल्लू मंडल फरारी असल्याचे पोलिसांनी सांगितले.

बुधवारपर्यंत मिनार मंडलच्या घरातून २० कोटींची रोकड जप्त करण्यात आली होती. त्यानंतर रोकड मोजणी पूर्ण झाल्यावर ती अनेक लोखंडी ट्रंकमधून बाहेर काढून सीलबंद अवस्थेत मोहम्मद बाजार पोलिस ठाण्यात नेण्यात आली. ही रक्कम बँकेत जमा केली जाणार असल्याचे पोलिस सूत्रांनी सांगितले.

बुधवारी मिनार मंडल आणि त्याच्या मुलाला चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले होते. त्यानंतर गुरुवारी सकाळी त्याला औपचारिक अटक करण्यात आली असून, स्थानिक न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. टुल्लू मंडल उर्फ महंमद नजीबुद्दीन हा प्रभावशाली व्यावसायिक असून, त्याच्यावर अवैध वाळू आणि दगड उत्खननाशी संबंधित कारवायांचे आरोप आहेत.

पोलिसांच्या माहितीनुसार, देउचा गावातील मिनार मंडलच्या दुमजली घरातून प्रत्येकी एक किलो वजनाचे सोन्याचे १४ बार आणि १०० ग्रॅम वजनाची १० सोन्याची बिस्किटे जप्त करण्यात आली. सध्याच्या बाजारभावानुसार या सोन्याची किंमत सुमारे २१.५० कोटी असल्याचा अंदाज आहे.