दोन वर्षे मुदतवाढीसह नियमित सेवेची संधी

Contributed by: म. टा. विशेष प्रतिनिधी,नवी दिल्ली|महाराष्ट्र टाइम्स.कॉम•
दोन वर्षे मुदतवाढीसह नियमित सेवेची संधी
अग्निपथ योजनेअंतर्गत सैन्यदलात भरती झालेल्या जवानांना ( अग्निवीर ) दोन वर्षांची सेवा वाढवून आणि नियमित भरतीची मोठी संधी देऊन केंद्र सरकारने त्यांना दिवाळी भेट दिली आहे. चार वर्षांचा कार्यकाळ पूर्ण झाल्यानंतर यंदा डिसेंबरमध्ये सेवामुक्त होणाऱ्यांना दोन वर्षांचा अतिरिक्त सेवाकाळ देण्यात येणार आहे. त्यानंतर निर्धारित पात्रता निकष पूर्ण करणाऱ्यांना नियमित सैन्यभरतीची संधी देण्याच्या प्रस्तावाला केंद्रीय मंत्रिमंडळाने बुधवारी मंजुरी दिली. याचा लाभ तिन्ही सैन्यदलांतील तीन लाखांहून जास्त अग्निवीरांना होण्याची शक्यता आहे.

भरतीनंतर चार वर्षांनी ७५ टक्के अग्निवीरांच्या भवितव्याबाबतची अनिश्चितता आणि अलीकडेच विविध ठिकाणी झालेली विद्यार्थी आंदोलने, ‘जेन झी’मध्ये उमटणारा तरुणाईचा अस्वस्थ सूर पाहता सरकारचा हा निर्णय तरुणांमधील नाराजी कमी करण्याच्या प्रयत्नाचाही एक भाग मानला जात आहे.
माहिती आणि प्रसारणमंत्री अश्विनी वैष्णव यांच्यासोबत झालेल्या पत्रकार परिषदेत चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ जनरल एन. एस. राजासुब्रमणी यांनी ही माहिती दिली. ‘मात्र, या निर्णयामुळे अग्निपथ योजनेतील मूळ भरतीपद्धत रद्द होणार नाही,’ असेही त्यांनी स्पष्ट केले.