Contributed by: म. टा. विशेष प्रतिनिधी,नवी दिल्ली|महाराष्ट्र टाइम्स.कॉम•
‘दोनपेक्षा अधिक अपत्ये असल्यास निवडणूक लढवण्यास अपात्र ठरवणाऱ्या कायद्यांची प्रासंगिकता संपली आहे,’ असे महत्त्वपूर्ण निरीक्षण सर्वोच्च न्यायालयाने बुधवारी नोंदवले. ‘देशाच्या लोकसंख्याशास्त्रीय स्थितीत मोठे बदल झाले असून, अतिलोकसंख्येचे भयही कालबाह्य ठरले आहे,’ असे न्यायालयाने म्हटले.
या कायद्यांच्या घटनात्मक वैधतेचा फेरविचाराचे प्रकरण न्या. पी. एस. नरसिंह आणि न्या. आलोक आराधे यांच्या खंडपीठाने मोठ्या पीठाकडे पाठवले. दोनपेक्षा अधिक अपत्यांबाबतचे सर्व कायदे न्यायालयाने रद्द केलेले नाहीत. महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम १९५९मधील कलम १४(१)(जे-१) या तरतुदीला मंगला भीमराव इंगळे यांनी आव्हान दिले होते.