Dismissal Of Neet Petitions Creates Uproar Among Students
‘नीट’च्या याचिका फेटाळल्या
महाराष्ट्र टाइम्स•
(फोटो- महाराष्ट्र टाइम्स)
‘ नीट ' फेरपरीक्षेच्या निकालांना आव्हान देणाऱ्या याचिका मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने गुरुवारी फेटाळून लावल्या. तसेच प्रत्येक याचिकाकर्त्यावर पाच हजार रुपये ‘कॉस्ट’ लावण्यात आली. यापैकी दोन याचिकाकर्त्यांनी खंडपीठात विनंती करून याचिका मागे घेतली.
'नीट'च्या फेरपरीक्षेनंतर निकाल जाहीर झाल्यानंतर चार विद्यार्थ्यांनी हा निकाल चुकीचा आणि तफावत असलेला आहे, असा दावा करीत खंडपीठात याचिका दाखल केल्या होत्या. हे प्रकरण न्या. एन. बी. सूर्यवंशी आणि न्या. आबासाहेब शिंदे यांच्या खंडपीठासमोर सुनावणीला आले. ऋचा प्रफुल्ल देशपांडे, सोहम नितीन गवते, अथर्व नरेंद्र जगताप आणि राहुल अरुण नाग या चार विद्यार्थ्यांच्या याचिकांमध्ये चुकीची तपासणी झाल्याचा व चुकीचा निकाल जाहीर करण्यात आल्याचे म्हणणे मांडण्यात आले होते. प्राथमिक सुनावणीत खंडपीठाने प्रतिवादींना नोटीस बजावून मूळ उत्तरपत्रिका मागवल्या होत्या. सुनावणीत या मूळ उत्तरपत्रिका न्यायालयासमोर सादर करण्यात आल्या. न्यायालयाने त्यांची पडताळणी केली. संबंधित विद्यार्थी, त्यांचे पालक आणि त्यांच्या वकिलांनाही मूळ उत्तरपत्रिका पाहून खात्री करण्याची संधी देण्यात आली. मूळ कागदपत्रांच्या तपासणीनंतर ‘एनटीए’ने जाहीर केलेले गुण आणि निकाल मूळ उत्तरपत्रिकांप्रमाणे असल्याचे स्पष्ट झाले.मूळ उत्तरपत्रिकांची पडताळणी केल्यानंतर आणि दोन्ही पक्षांचे म्हणणे ऐकून घेतल्यानंतर खंडपीठाने ‘एनटीए’ने जाहीर केलेला निकाल योग्य असल्याने चारही याचिका फेटाळून नामंजूर केल्या, तसेच चुकीच्या आणि अपुऱ्या माहितीच्या आधारे याचिका केल्याबद्दल चारही याचिकाकर्त्यांवर प्रत्येकी पाच हजार रुपये ‘कॉस्ट’ लावण्याचे आदेशही खंडपीठाने दिले. दोन याचिकाकर्त्यांनी विनंती करून याचिका मागे घेतल्या. ‘एनटीए’ आणि केंद्र शासनाच्या वतीने डेप्युटी सॉलिसिटर जनरल ॲड. अजय तल्हार आणि ॲड. रोहित सर्वज्ञ यांनी काम पाहिले.