‘आयआयएम’ कागदावरच

Contributed by: हर्ष दुधे harsh.dudhe@timesofindia.com|महाराष्ट्र टाइम्स.कॉम•
‘आयआयएम’ कागदावरच
पुणे : ‘इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट मुंबईचे (आयआयएम, मुंबई) पुणे केंद्र वर्षभरात सुरू होऊन अभ्यासक्रमांना सुरुवात होणार,’ अशी घोषणा केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी सप्टेंबर २०२५मध्ये केली होती. मात्र, वर्ष उलटल्यानंतरही हे केंद्र कागदोपत्रीच असून, प्रत्यक्ष अभ्यासक्रम सुरू होण्याचा पत्ता नाही. केंद्रासाठी जागा निश्चित झालेली नाही, स्वतंत्र आर्थिक तरतूदही करण्यात आलेली नाही. त्यामुळे ‘आयआयएम, मुंबई’च्या पुणे केंद्राचे भवितव्य अद्याप अधांतरी आहे.

पुण्यात स्वतंत्र ‘आयआयएम’ असावे, अशी अनेक वर्षांपासून मागणी होती. मात्र, पुण्याऐवजी नागपूरला ‘आयआयएम’ मिळाले. कालांतराने त्याचे केंद्र पिंपरी-चिंचवड परिसरात सुरू झाले. या पार्श्वभूमीवर पुण्याचे खासदार आणि केंद्रीय नागरी वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी ‘आयआयएम’ मुंबईचे केंद्र पुण्यात सुरू करण्याचा प्रस्ताव मांडला होता. ‘आयआयएम’च्या डीन कमिटी आणि शैक्षणिक परिषदेने याला प्रस्तावाला मान्यता दिल्यानंतर २१ सप्टेंबर २०२५ रोजी मोहोळ यांनी केंद्राबाबत माहिती दिली होती.
शैक्षणिक वर्ष २०२६पासून पुणे केंद्रात क्षमता विकास कार्यक्रम आणि अल्पावधीचे कार्यकारी प्रशिक्षण कार्यक्रम सुरू करण्याचे नियोजन असल्याचे ‘आयआयएम मुंबई’चे संचालक प्रा. मनोजकुमार तिवारी यांनी जाहीर केले होते. मात्र, शैक्षणिक वर्ष २०२६-२७ सुरू होऊनही या घोषणेची अंमलबजावणी झालेली नाही. केंद्रासाठी जागा किंवा शैक्षणिक संस्थेची इमारत घेण्याबाबत सरकारी निर्णय झालेला नाही. याबाबत प्रतिक्रियेसाठी मुरलीधर मोहोळ यांच्याशी संपर्क साधला असता, प्रतिसाद मिळाला नाही.

‘आयआयएम, नागपूर’चे पुणे केंद्र २०२१मध्ये पिंपरी-चिंचवडमधील ‘सीआयआरटी’च्या जागेत सुरू झाले. त्यानंतर ते २०२३पासून ‘वॅमनिकॉम’च्या जागेत स्थलांतरित झाले. महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी जुलै २०२६मध्ये या केंद्राच्या स्वतंत्र शैक्षणिक संकुलासाठी ७० एकर जागा देण्याचा निर्णय घेतला. एकीकडे नागपूरच्या केंद्रासाठी स्वतंत्र संकुलाची तयारी सुरू असताना पुण्यातील केंद्र मात्र घोषणेपलीकडे गेलेले नाही.

‘आयआयएम’ कागदावरच