पोलो वर्ल्ड कपच्या संघनिवडीवरून वाद

महाराष्ट्र टाइम्स.कॉम•
polo world cup team selection controversy unveiled
नवी दिल्ली : पोलो वर्ल्ड कपच्या विभागीय प्ले-ऑफसाठी भारतीय संघाची निवड वादात सापडली आहे. संघातून वगळण्यात आलेल्या नवीनसिंगने निवड प्रक्रियेत अनियमितता झाल्याचा आरोप केला. कोकेन चाचणीत अपयशी ठरलेल्या एका खेळाडूचा संघात समावेश करण्यात आल्याचा दावा त्याने केला. हा खेळाडू प्रारंभीच्या १२ जणांच्या यादीत नव्हता, प्रशिक्षण शिबिरात सहभागी झाला नव्हता, असेही त्याने म्हटले आहे.

सीफर्ट किवी संघात
ऑकलंड : भारताविरुद्धच्या टी-२० क्रिकेट मालिकेतील अखेरच्या सामन्यात विजयाचा शिल्पकार ठरलेल्या टिम सीफर्टवर न्यूझीलंड क्रिकेट बोर्डाने उद्या, बुधवारपासून सुरू होणाऱ्या वन-डे मालिकेसाठीही विश्वास दाखवला आहे. न्यूझीलंडचा वन-डे संघ : पहिल्या तीन सामन्यांसाठी : मिचेल सँटनर (कर्णधार), मायकेल ब्रेसवेल, डेव्हॉन कॉनवे, जेकब डफी, मॅट फिशर, मॅट हेन्री, कायल जेमिसन, टॉम लॅथम (यष्टीरक्षक), डॅरिल मिचेल, हेन्री निकोल्स, ग्लेन फिलिप्स, टिम सीफर्ट, नॅथन स्मिथ, विल यंग, ब्लेअर टिकनर.

लक्ष्य सेनची माघार

यिओसू (दक्षिण कोरिया) : नुकतीच हायलो ओपन जिंकलेल्या भारताच्या लक्ष्य सेनने कोरिया ओपन सुपर-५०० बॅडमिंटन स्पर्धेतून माघार घेतली आहे. त्याच्या जागी अनुभवी एच. एस. प्रणॉय भारतीय आव्हानाचे नेतृत्व करणार आहे. ही स्पर्धा आज, मंगळवारपासून सुरू होत आहे. प्रणॉयची सलामीची लढत दक्षिण कोरियाच्या यू ताए बिनविरुद्ध होईल. महिला एकेरीत तन्वी शर्मा, मालविका बनसोड आणि अनमोल खरब भारताचे प्रतिनिधित्व करतील.

प्रशांत सुतारही मैदानात

चेन्नई : महाराष्ट्र राज्य लॉन टेनिस संघटनेचे अध्यक्ष प्रशांत सुतार यांनी अखिल भारतीय टेनिस संघटनेच्या उपाध्यक्षपदासाठी उमेदवारी जाहीर केली. २७ नोव्हेंबरला होणाऱ्या निवडणुकीत त्यांचा सामना माजी टेनिसपटू लिअँडर पेस याच्याशी होणार आहे.

सेंथिल अंतिम फेरीत

नवी दिल्ली : भारताचा स्क्वॉशपटू वेलवन सेंथिलकुमार चेक ओपनच्या अंतिम फेरीत प्रवेश केला. उपांत्य सामन्यात चौथ्या मानांकित सेंथिलकुमारने फ्रान्सच्या ऑगस्ट दुसार्डचा ११-७, १२-१०, ११-१ असा पराभव केला.

झ्वेरेव नंबर वन

लंडन : जर्मनीच्या अलेक्झांडर झ्वेरेवने पुरुष टेनिस क्रमवारीत प्रथमच अव्वल स्थान मिळवले. यंदा त्याने फ्रेंच ओपन आणि यूएस ओपन जिंकून दोन ग्रँड स्लॅम विजेतेपदे पटकावली. विम्बल्डनची अंतिम फेरी आणि ऑस्ट्रेलियन ओपनची उपांत्य फेरी गाठणाऱ्या झ्वेरेवने मोसमात ६५ विजय मिळवले. तो नंबर वन होणारा दुसरा जर्मन ठरला. जॅनिक सिनर दुसऱ्या, तर कार्लोस अल्काराझ तिसऱ्या स्थानावर आहे.

धिनिथीला ब्राँझपदक

डकार : भारतीय जलतरणपटू धिनिथी देशिंगूने युवा ऑलिम्पिकच्या महिलांच्या १०० मीटर फ्री स्टाइलमध्ये ब्राँझपदक जिंकले. तिने ५६.२७ सेकंदांची वेळ नोंदवली. गुजरातची १५ वर्षीय ज्युदोपटू खुशबू राजकभाईने महिलांच्या ६३ किलो गटाची अंतिम फेरी गाठून किमान रौप्यपदक निश्चित केले. अंतिम सामन्यात तिचा सामना जर्मनीच्या जोलीना रेनहोल्डशी होईल.