न्यायालयासह मेट्रो स्थानकाला बॉम्बची धमकी

Contributed by: पुणे,म. टा. प्रतिनिधी|महाराष्ट्र टाइम्स.कॉम•
न्यायालयासह मेट्रो स्थानकाला बॉम्बची धमकी
शिवाजीनगर येथील पुणे जिल्हा व सत्र न्यायालयाला सोमवारी न्यायालयाच्या आवारात आणि मेट्रो स्थानकात बॉम्ब ठेवल्याची धमकी देणारा ‘ई-मेल’ मिळाल्याने खळबळ उडाली. पुण्यासह मुंबई, नाशिक, नागपूर, छत्रपती संभाजीनगर या न्यायालयांनाही असे ई-मेल मिळाल्याचे उघडकीस आले आहे

सुरक्षा व खबरदारीचा उपाय म्हणून न्यायालयीन कामकाज तातडीने थांबविण्यात आले. न्यायाधीश, वकील, कर्मचारी आणि पक्षकारांना न्यायालयाच्या आवाराबाहेर काढण्यात आले. बॉम्बशोधक-नाशक पथकाने न्यायालयासह वकिलांचे चेंबर आणि मेट्रो स्थानक परिसराची कसून तपासणी केली. पाच तासांच्या तपासणीत कोणतीही संशयास्पद वस्तू सापडली नाही. त्यानंतर सर्वांनी सुटकेचा निःश्वास सोडला.
न्यायालयाचे कामकाज सुरू झाल्यानंतर सकाळी सव्वाअकराच्या सुमारास हा धमकीचा ई-मेल प्रशासनाला मिळाला. त्यामध्ये शिवाजीनगर न्यायालय; तसेच मेट्रोस्थानक बॉम्बने उडवून देण्याच धमकी देण्यात आली होती. न्यायालय प्रशासनाने तातडीने पोलिसांशी संपर्क साधला. प्रमुख जिल्हा न्यायाधीशांच्या आदेशाने पोलिसांनी न्यायालयाचा परिसर मोकळा करण्यास सुरुवात केली. तोपर्यंत बॉम्बशोधक-नाशक पथक घटनास्थळी दाखल झाले. पथकाने संपूर्ण न्यायालय परिसर, विविध इमारती, न्यायाधीशांची दालने; तसेच वकिलांच्या चेंबर्सची पाच तास कसून तपासणी केली. सकाळी सव्वाअकरापासून सुरू झालेली ही शोधमोहीम दुपारी सव्वाचारपर्यंत सुरू होती. या तपासणीदरम्यान कुठेही संशयास्पद अथवा बॉम्बसदृश वस्तू सापडली नाही. परिसर सुरक्षित असल्याची खात्री पटल्यानंतर प्रमुख न्यायाधीशांच्या आदेशाने न्यायालयाचे कामकाज पूर्ववत करण्यात आले. याशिवाय पोलिस व बॉम्बशोधक-नाशक पथकाकडबव मेट्रोस्थानक परिसराचीही पाहणी करून सुरक्षिततेची खातरजमा केली.

ई-मेल पाठविणाऱ्याचा शोध घेण्यात येत असून, तांत्रिक तपास सुरू करण्यात आला आहे. या प्रकरणी शिवाजीनगर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याचे पोलिस आयुक्त अमितेशकुमार यांनी सांगितले.

महापालिकेतील महापौर कार्यालय बॉम्बने उडवून देण्याची धमकी देणारा ई-मेल महापालिकेच्या अधिकृत ई-मेलवर सोमवारी दुपारी आल्याने सुरक्षा यंत्रणा सतर्क झाली. खलिस्तान नॅशनल आर्मीकडून २७ नोव्हेंबर रोजी महापौर कार्यालय आणि मेट्रोस्थानक बॉम्बने उडवून देणार असल्याचे या ई-मेलमध्ये म्हटले आहे.