वाहनविक्रीत निष्काळजी पडू शकते महागात

महाराष्ट्र टाइम्स.कॉम•
वाहनविक्रीत निष्काळजी पडू शकते महागात
नी गाडी विकली, पैसे घेतले आणि व्यवहार संपला, असे अनेक वाहनधारकांना वाटते. मात्र, जुने वाहन विकल्यानंतर केवळ ताबा देऊन मोकळे होणे पुरेसे नाही. वाहनाची मालकी हस्तांतरणाची प्रक्रिया पूर्ण न केल्यास भविष्यात अपघात, वाहतूक नियमांचे उल्लंघन किंवा गुन्ह्याशी संबंधित कायदेशीर जबाबदारीचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. त्यामुळे वाहन विक्री, खरेदी आणि आयुर्मान संपलेल्या वाहनांच्या विल्हेवाटीच्या प्रत्येक टप्प्यावर आवश्यक कागदपत्रे व नोंदी तपासणे महत्त्वाचे आहे. अन्यथा वाहनविक्रीतील निष्काळजी महागात पडू शकते.

खरेदीदाराची ओळख तपासा : वाहन खरेदी करणाऱ्याचे पूर्ण नाव, पत्ता, मोबाइल क्रमांक आणि वैध ओळखपत्राची माहिती घ्या. शक्यतो खरेदीदाराला प्रत्यक्ष भेटूनच व्यवहार करा. केवळ दलालाच्या भरवशावर अनोळखी व्यक्तीकडे वाहन सुपूर्द करू नका.
वाहन विक्रीची तारीख, वेळ, किंमत, खरेदीदाराचे तपशील आणि वाहनाचा नोंदणी क्रमांक नमूद असलेला विक्री करार किंवा पावती तयार करा. वाहनाचा ताबा दिल्याची तारीख व वेळ स्पष्टपणे नमूद करा. पैसे मिळाल्याचा पुरावा, बँक व्यवहाराची नोंद आणि खरेदीदाराशी झालेला पत्रव्यवहार जतन करा. वाहनाच्या चाव्या आणि कागदपत्रे सुपूर्द केल्याची नोंदही ठेवा.

आरटीओ कार्यालयातील मालकी हस्तांतरण पूर्ण करा : वाहन विकणाऱ्या व्यक्तीने नमुना २९ द्वारे विक्रीची माहिती संबंधित नोंदणी प्राधिकरणाला द्यावी. खरेदीदाराने नमुना ३० द्वारे मालकी हस्तांतरणासाठी अर्ज करावा. एकाच राज्यातील वाहनाच्या हस्तांतरणासाठी १४ दिवस, तर दुसऱ्या राज्यातील वाहनासाठी ४५ दिवसांची मुदत आहे. हस्तांतरणाची स्थिती तपासा आणि नोंदणी प्रमाणपत्रावर नवीन मालकाचे नाव नोंदल्याची खात्री करा.

वाहन विकल्यानंतर विम्याचीही काळजी घ्या : विमा कंपनीला वाहन विकल्याची माहिती द्या. विमा हस्तांतरणाची प्रक्रिया पूर्ण झाली आहे का, याची खात्री करा. विक्री करार, प्रादेशिक परिवहन कार्यालयातील अर्जाची पोच आणि अन्य संबंधित पुरावे सुरक्षित ठेवा.

जुने वाहन खरेदी करताना हे तपासा...

नोंदणी प्रमाणपत्रावरील नाव आणि विक्रेत्याची ओळख पडताळा.

वाहनाचा नोंदणी क्रमांक, सांगाडा क्रमांक आणि इंजिन क्रमांक कागदपत्रांशी जुळतात का, ते तपासा.

वाहनावर कर्जाचा बोजा, गहाणखत, प्रलंबित ई-चलने किंवा अन्य कायदेशीर अडचणी आहेत का, हे तपासा.

वाहनाचा पूर्वीचा मालक कोण होता, तसेच विक्रेता नोंदणीकृत मालक नसल्यास त्याला वाहन विकण्याचा कायदेशीर अधिकार आहे का, हे तपासा.

वाहन चोरीचे असल्याचा किंवा गुन्ह्यात वापर झाल्याचा संशय असल्यास व्यवहार करू नका.

वाहनाचा ताबा घेतल्यानंतर नोंदणी प्रमाणपत्रावरील मालकी आपल्या नावावर हस्तांतरित करून घ्या.

आयुर्मान संपलेल्या वाहनांचे काय कराल?

नोंदणीकृत वाहन भंगार केंद्र निवडा. केंद्र सरकारच्या नियमांनुसार नोंदणीकृत वाहन भंगार सुविधा केंद्रातच वाहन जमा करा.

वाहनाची कागदपत्रे सोबत ठेवा. नोंदणी प्रमाणपत्र, वाहनमालकाचे ओळखपत्र आणि केंद्राकडून मागितलेली आवश्यक कागदपत्रे सादर करा. वाहनावर कर्ज असल्यास त्यासंबंधीची प्रक्रिया पूर्ण करावी लागू शकते.

वाहन जमा केल्याची अधिकृत पावती घ्या. वाहन जमा केल्यानंतर संबंधित केंद्राकडून अधिकृत पावती आणि वाहन जमा केल्याचे प्रमाणपत्र घ्या. वाहनाची नोंदणी रद्द करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे का, हेही तपासा.

नोंदणी रद्द झाल्याची खात्री करा. वाहन भंगारात दिल्याची पावती मिळणे आणि प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या नोंदीत वाहनाची नोंदणी रद्द होणे या स्वतंत्र प्रक्रिया आहेत. दोन्ही प्रक्रिया नियमानुसार पूर्ण झाल्याची खात्री करा आणि संबंधित कागदपत्रे जतन करा.

केवळ वय झाले म्हणून वाहन भंगारात देणे बंधनकारक नाही. वाहनाच्या वयानुसार लागू होणारे नियम, नोंदणीचे नूतनीकरण, वाहनाची प्रत्यक्ष स्थिती आणि संबंधित क्षेत्रातील निर्बंध विचारात घ्या.

संकलन : महेश चेमटे