कोरेगाव पार्कातील पबवर कारवाई

महाराष्ट्र टाइम्स.कॉम•
aggressive action against plunge pub in koregaon park strict measures against law offenders
पुणे : निर्धारित वेळेनंतरही सुरू असलेल्या कोरेगाव पार्कमधील ‘प्लंज’ पबवर कारवाई करून पुढील आदेश मिळेपर्यंत तो बंद ठेवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. रात्री दीड वाजेपर्यंतच पब सुरू ठेवण्याची परवानगी असताना हा पब रात्री दोननंतरही सुरू होता. विशेष म्हणजे, पोलिस मार्शलने तपासणी करून पब बंद असल्याची खात्री केल्यानंतर तेथून निघताच काही वेळात पुन्हा पब सुरू करण्यात आला होता.

कोरेगाव पार्कमधील ‘प्लंज’ पबकडून वेळेच्या नियमांचे उल्लंघन होत असल्याची माहिती पोलिस आयुक्त अमितेशकुमार यांना मिळाली होती. त्यांनी या प्रकरणाच्या चौकशीचा आदेश दिला. त्यानुसार रात्री दीड वाजता पब बंद झाला आहे, की नाही याची खातरजमा करण्यासाठी पोलिस मार्शल तेथे गेले होते. त्या वेळी पब बंद केल्याचे चालकाने सांगितले. त्यामुळे मार्शल तेथून गेले. मात्र, पोलिस मार्शल निघून गेल्यानंतर पुन्हा पब सुरू करण्यात आला. तपासणीवेळी पब बंद असल्याचे दाखवून नंतर पुन्हा सुरू केला जात असल्याचा संशय या प्रकारामुळे व्यक्त होत आहे.