Young Man Climbs Mobile Tower To Get Marriage Approval
लग्नाच्या होकारासाठी तरुण मोबाइल टॉवरवर
महाराष्ट्र टाइम्स.कॉम•
पिंपरी : प्रेमात वेडा झालेला तरुण आपल्या प्रेयसीचा लग्नाला होकार मिळविण्यासाठी थेट मोबाइल टॉवरवर चढला. त्याच्या या अतिसाहसामुळे पोलिस, अग्निशमन दलाची मोठी धावपळ झाली. नातेवाइकांनी त्याला विनवण्या केल्या. शेवटी पोलिसांनी शक्कल लढवून त्याच्या प्रेयसीला हातात पुष्पहार घेऊन टॉवरखाली उभे केले. हे पाहून आपली प्रेयसी लग्नाला तयार झाल्याचा समज करून तरुण टॉवरवरून खाली उतरला. हा प्रकार रविवारी (एक नोव्हेंबर) मामुर्डी येथे घडला.
उबेदुल्ला शेख (वय २२, मूळ रा. धुबरी, आसाम) असे या तरुणाचे नाव आहे. मामुर्डी येथील गोदरेज कंपनीच्या टाउनशिपमधील व्होडाफोनच्या लोखंडी टॉवरवर तो दुपारी साडेतीनच्या सुमारास चढला होता. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, उबेदुल्लाचे शेजारी राहणाऱ्या तरुणीसोबत प्रेमसंबंध आहेत. दोघांमध्ये किरकोळ कारणावरून वाद झाला होता. त्यानंतर मद्यधुंद अवस्थेत त्याने थेट मोबाइल टॉवर गाठला. सुमारे शंभर फूट उंचीवर जाऊन तो बसल्याने परिसरात खळबळ उडाली. घटनेची माहिती मिळताच देहूरोड पोलिसांचे डीबी पथक, ११२ क्रमांकाचे पथक आणि अग्निशमन दलाच्या दोन गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. खबरदारी म्हणून रुग्णवाहिकाही तैनात करण्यात आली.उबेदुल्लाला उतरविण्यासाठी पोलिसांनी त्याची प्रेयसी, नातेवाईक आणि ओळखीच्या व्यक्तींची मदत घेतली. मोबाइलवरून त्याच्याशी सातत्याने संवाद साधून समजूत काढण्यात आली. अखेर प्रेयसीला हातात हार घेऊन लग्नास होकार द्यायला लावण्यात आला. त्यानंतर अग्निशमन दलाच्या मोठ्या क्रेनच्या मदतीने सायंकाळी सव्वासातच्या सुमारास त्याला सुखरूप खाली उतरविण्यात आल्याचे देहूरोड पोलिस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक विक्रम बनसोडे यांनी सांगितले.