Improving Teachers Work Information Filling On Saturdays
माहितीभरणा शनिवारीच!
Contributed by: म. टा. खास प्रतिनिधी,मुंबई|महाराष्ट्र टाइम्स.कॉम•
अध्यापन सोडून ऑनलाइन माहिती भरण्यातच शिक्षकांचा मोठा वेळ जात असल्याच्या तक्रारींची दखल घेत प्राथमिक शिक्षण संचालनालयाने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. मुंबईसह ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांतील शाळांमधील मुख्याध्यापक, शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांकडून विविध प्रकारची माहिती सोमवार ते शुक्रवार या काळात मागवू नये, असे स्पष्ट आदेश संचालनालयाने दिले आहेत. शिक्षकांनी आठवड्यातील पाच दिवस केवळ अध्यापनाचे काम करावे आणि माहिती भरण्याचे काम शनिवारी करावे, असे या आदेशात नमूद करण्यात आले आहे.
सरल, यू-डायस, आधार अद्ययावत करणे, पीएम पोषण (मध्यान्ह भोजन) यांसह विविध शैक्षणिक योजनांची माहिती ऑनलाइन आणि ऑफलाइन पद्धतीने नियमितपणे मागवली जाते. शिक्षण विभागातील वेगवेगळ्या कार्यालयांकडून रोजच माहितीची मागणी होत असल्याने शिक्षकांवरील अशैक्षणिक कामांचा भार वाढला आहे. परिणामी, विद्यार्थ्यांना शिकवण्यासाठी आणि अध्यापनाचे नियोजन करण्यासाठी मिळणारा वेळ कमी होत असल्याची तक्रार शिक्षकांकडून केली जात होती.शालेय शिक्षण विभागाने यापूर्वीच ‘माहितीचा वार शनिवार‘ हे धोरण निश्चित केले आहे. मात्र, या धोरणाची प्रभावी अंमलबजावणी होत नसल्याने मुंबई आणि कोकणातील अनेक शाळांमध्ये सोमवार ते शुक्रवारही माहिती मागवली जात असल्याचे समोर आले होते. यामुळे शिक्षकांना अध्यापनाबरोबरच माहिती संकलन , नोंदी अद्ययावत करणे आणि विविध अहवाल सादर करण्यासाठी वेळ द्यावा लागत होता.
या पार्श्वभूमीवर शिक्षक महासंघाचे मुंबई व कोकण विभागाचे अध्यक्ष अनिल बोरनारे यांनी १९ ऑक्टोबर रोजी शिक्षण संचालकांकडे तक्रार केली होती. त्यानंतर प्राथमिक शिक्षण संचालनालयाने मुंबई विभागीय शिक्षण उपसंचालकांना लेखी आदेश दिले. मुंबईतील शिक्षण निरीक्षकांच्या उत्तर, पश्चिम आणि दक्षिण विभागांसह नमूद पाच जिल्ह्यांतील शाळांना या सूचनांचे पालन करण्यास सांगण्यात आले आहे. आदेशानुसार, विद्यार्थ्यांची उपस्थिती, पीएम पोषण आहाराची नोंद आणि आपत्कालीन किंवा विधिमंडळाशी संबंधित माहिती यांसारख्या नमूद अपवादांव्यतिरिक्त नियमित माहिती शनिवारीच सादर करायची आहे.