Drop In Enrollment At Dr Babasaheb Ambedkar University 1000 Vacant Seats
दीड हजार जणांनी घेतले प्रवेश
महाराष्ट्र टाइम्स•
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ व धाराशिव उपपरिसरातील विभागांमधील पदवी व पदव्यूत्तर अभ्यासक्रमांच्या एक हजार ३४३ जागांवरील प्रवेश रिक्त आहेत. दोन महिन्यांपासून सुरू असलेल्या प्रवेश प्रक्रियेत विविध अभ्यासक्रमांना एक हजार ५९३ विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतले आहे. रिक्त जागांवर प्रवेशाची मुदत शुक्रवारी (३१ जुलै) सायंकाळपर्यंत आहे.
विद्यापीठातील मुख्य परिसरासह उपकेंद्रातील विभागांमधील अभ्यासक्रमांसाठीची प्रवेश प्रक्रिया २ जूनपासून सुरू झाली आहे. समर्थ पोर्टलच्या माध्यमातून ही प्रक्रिया सुरू आहे. प्रवेश फेऱ्या संपल्यानंतर रिक्त जागा ंवर प्रवेशासाठी विभागप्रमुखांना अधिकार देण्यात आले होते. प्रवेश प्रक्रिया ३१ जुलैपर्यंत चालणार आहे. विद्यापीठातील काही अभ्यासक्रमांना पूर्ण क्षमतेने प्रवेश झाल्याचे आकडेवारीतून समोर आले आहे. त्याचवेळी पारंपारिक अभ्यासक्रमांसह नव्यानेच सुरू करण्यात आलेल्या अनेक अभ्यासक्रमांना मोठ्या प्रमाणात रिक्त जागा आहेत. ३० जुलैपर्यंत विद्यापीठातील दोन हजार ९३६ जागांपैकी एक हजार ५९३ विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतले. तर एक हजार ३४३ विद्यार्थ्यांच्या जागा अद्यापपर्यंत रिक्त असल्याची आकडेवारी समोर आली आहे. मुख्य परिसरात ४६ तर उपपरिसरात १० असे एकूण ५६ विभाग कार्यरत आहेत.