दादा कोंडके, निळू फुले, लक्ष्मीकांत बेर्डेंना ‘मामाच्या गोव्याला जाऊ या’ची अनोखी मानवंदना!

महाराष्ट्र टाइम्स.कॉम•
दादा कोंडके, निळू फुले, लक्ष्मीकांत बेर्डेंना ‘मामाच्या गोव्याला जाऊ या’ची अनोखी मानवंदना!
आजपासून सर्वत्र प्रदर्शित झालेला दिग्दर्शक विजू माने यांचा ‘ मामाच्या गोव्याला जाऊ या ’ हा चित्रपट मनोरंजनासोबतच मराठी सिनेसृष्टीतल्या अनेक दिग्गज कलाकारांना आणि त्यांच्या अजरामर योगदानाला मनापासून वाहिलेली आदरांजलीही ठरत आहे. विशेष म्हणजे, या चित्रपटाचा क्लायमॅक्स मराठी चित्रपटसृष्टी गाजवणारे तीन महान कलाकार दादा कोंडके , निळू फुले आणि लक्ष्मीकांत बेर्डे यांना समर्पित करण्यात आला आहे.

या तिन्ही दिग्गजांनी आपल्या अभिनयानं, संवादांनी आणि अफाट लोकप्रियतेनं मराठी चित्रपटांना एक वेगळी ओळख मिळवून दिली; त्यामुळेच ‘मामाच्या गोव्याला जाऊ या’चा शेवट मराठी सिनेसृष्टीच्या सुवर्णकाळाला दिलेला मनस्वी सलाम ठरतो.
चित्रपटात नॉस्टॅल्जियाचे असे अनेक सुंदर क्षण अनुभवायला मिळतात. मकरंद अनासपुरे यांच्या तोंडी त्यांच्या गाजलेल्या चित्रपटांच्या नावांनी गुंफलेले संवाद हा त्यापैकी एक खास प्रयोग आहे, तर चित्रपटात ‘मामा’ असलेल्या अंकुश चौधरीच्या पत्नीची भूमिका ‘दुनियादारी’ चित्रपटातील ‘सुरेखा’ म्हणून प्रेक्षकांच्या मनात घर केलेल्या रिचा परियल्ली हिनं साकारली आहे; त्यामुळे ‘दुनियादारी’च्या जुन्या आठवणींनाही उजाळा मिळतो. याशिवाय ‘वणक्कम्’ हे गाणं दाक्षिणात्य सुपरस्टार रजनीकांत यांना दिलेली आगळीवेगळी मानवंदना ठरते.

या सगळ्या संदर्भांचा परमोच्च बिंदू म्हणजे, दादा कोंडके, निळू फुले आणि लक्ष्मीकांत बेर्डे यांना वाहिलेली आदरांजली. या तिघांना चित्रपटानं अत्यंत संवेदनशील आणि हृदयस्पर्शी पद्धतीनं स्पर्श केला आहे.

याविषयी दिग्दर्शक विजू माने म्हणाले, ‘मामाच्या गोव्याला जाऊ या’ करताना फक्त मनोरंजनाचा चित्रपट बनवायचा नव्हता, तर मराठी सिनेसृष्टीनं आपल्याला दिलेल्या असंख्य आठवणींना सलाम करायचा होता. दादा कोंडके, निळू फुले आणि लक्ष्मीकांत बेर्डे यांना वाहिलेली आदरांजली हा चित्रपटातला आमच्यासाठी सर्वांत भावनिक क्षण आहे.’

‘विजुमेनिया प्रा. लि.’ आणि ‘लाइट अँड शेड’ प्रस्तुत या चित्रपटाचं लेखन, दिग्दर्शन आणि निर्मिती विजू माने यांनी केली असून, पटकथा आणि संवाद विजू माने, राहुल आवटे आणि कुशल बद्रिके यांचे आहेत. अंकुश चौधरी, कुशल बद्रिके, अभिजित चव्हाण, संतोष जुवेकर, नेहा खान, रुचिरा जाधव आणि विदुला चौगुले यांच्या प्रमुख भूमिका असलेला ‘मामाच्या गोव्याला जाऊ या’ हा चित्रपट आजपासून सर्वत्र चित्रपटगृहांत प्रदर्शित झाला आहे.