‘स्थायी’ कडून जेवणाचा प्रस्ताव स्थगित

महाराष्ट्र टाइम्स•
municipal committee postpones proposal for 590 rupee meal
सर्वसाधारण सभेत ५९० रुपयांचे जेवण आणि स्थायी समितीच्या बैठकीत ७० रुपयांचा नाश्ता देण्याचा प्रस्ताव गुरुवारी झालेल्या स्थायी समितीच्या बैठकीत स्थगीत करण्यात आला. या प्रस्तावाला नगरसेवकांनी विरोध केला. सभापती अनिल मकरिये यांनी सुधारित प्रस्ताव सादर करण्याचे आदेश प्रशासनाला दिले.

स्थायी समितीच्या बैठकीत पालिका प्रशासनाने जेवण आणि नाश्ताच्या खर्चासह ३८ रुपयांचा चहा, १८ रुपये किंमतीचे सर्व प्रकारचे बिस्कीट, सात रुपयांची पाण्याची बाटली असे दर सादर करुन वर्षभरासाठी ३५ लाख रुपयांचे अंदाजपत्रक मंजूर करण्याची विनंती केली होती. या प्रस्तावावर सर्वच नगरसेवकांनी आक्षेप घेतला. भाजपचे राजगौरव वानखेडे, सुरेंद्र कुलकर्णी, माधुरी अदवंत यांनी प्रशासनाचे वाभाडे काढले. फाईव्ह स्टार हॉटेलमधील दर प्रस्तावात घेतले का असा सवाल त्यांनी केला. दरसूची कुठून आणली याचा खुलासा करण्याची मागणी देखील त्यांनी केली. ५९० रुपयांचे जेवण हॉटेलमध्ये पण नसते असे ते म्हणाले.
अतिरिक्त आयुक्त कल्पिता पिंपळे म्हणाल्या हे दर बाजारपेठेतील आहेत. अंदाजे खर्च किती होणार हे लक्षात येण्यासाठी ते दिले आहेत. खर्चाला मंजूरी मिळाल्यावर ई - निविदा प्रक्रिया केली जाणार आहे.

सभापती अनिल मकरिये यांनी प्रशासनाचा प्रस्ताव स्थगीत ठेवला व सुधारित प्रस्ताव सादर करण्याचे आदेश दिले.