‘रमाई आवास योजने’चे काम कासवगतीने

महाराष्ट्र टाइम्स•
‘रमाई आवास योजने’चे काम कासवगतीने
(फोटो- महाराष्ट्र टाइम्स)
रमाई आवास योजनेचे काम महापालिकेमार्फत कासवगतीने सुरु आहे असा उल्लेख करुन पालकमंत्री संजय शिरसाट यांनी नाराजी व्यक्त केली. कासवगती कायम राहिल्यास १९०० कोटी रुपयांचे वाटप कसे करणार असा सवाल त्यांनी पालिका आयुक्तांना केला.

रमाई आवास योजनेअंतर्गत लाभार्थींना प्रातिनिधिक स्वरुपात लाभ पत्र देण्याचा कार्यक्रम गुरुवारी (३० जुलै) महापालिकेतर्फे आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात पालकमंत्री बोलत होते. व्यासपीठावर ओबीसी कल्याणमंत्री अतुल सावे, महापौर समीर राजूरकर, उपमहापौर राजेंद्र जंजाळ, स्थायी समितीचे सभापती अनिल मकरिये, समाजकल्याण समितीचे सभापती जालिंदर शेंडगे, माजी महापौर त्रिंबक तुपे, नंदकुमार घोडेले, नगरसेविका कीर्ती शिंदे, हर्षदा शिरसाट, आयुक्त अमोल येडगे, अतिरिक्त आयुक्त रणजित पाटील, कल्पिता पिंपळे, उपायुक्त अपर्णा थेटे उपस्थित होते.
संजय शिरसाट म्हणाले, ‘रमाई आवास योजनेच्या फायलींना गतीने मंजूरी मिळाली पाहिजे. या साठीचा निधी माझ्या समाजकल्याण खात्याचा आहे.

महापालिकेचे त्यात कवडीचेही योगदान नाही, अधिकार मात्र सर्व आहेत. काहीही करा पण प्रत्येक महिन्याच्या एक तारखेला लाभार्थींची यादी जाहीर करा. दोन - चारशे फायली मंजूर करुन काही उपयोग नाही. नऊ हजार लाभार्थींना निधी मंजूर करायचा असल्यास कामाची गती वाढवावी लागेल.’

अतुल सावे म्हणाले, ‘सुमारे १८०० लाभार्थींना निधी वाटप होणार आहे, त्यासाठी फायली मंजूर करण्याची गती वाढवावी लागेल. त्यासाठी एक खिडकी योजना राबवावी लागेल.’ कार्यक्रमाचे प्रास्ताविक आयुक्त अमोल येडगे यांनी केले.