No Insurance Compensation Without A Valid Vehicle License Supreme Courts Important Decision
वैध वाहन परवाना नसल्यास भरपाई नाही
महाराष्ट्र टाइम्स.कॉम•
अपघाताच्या वेळी वाहनचालकाचा परवाना वैध नसल्यास किंवा त्याचे नूतनीकरण झालेले नसल्यास विमा कंपन्या नुकसानभरपाई देण्यास जबाबदार ठरणार नाहीत, असे सर्वोच्च न्यायालयाने गुरुवारी स्पष्ट केले. आक्षेपार्ह वाहन वैध वाहनचालक परवान्याशिवाय चालवले जात असेल, तर त्या वाहनाच्या अपघाताबाबतची जबाबदारी विमा कंपनीवर टाकता येणार नाही, असेही सर्वोच्च न्यायालयाने म्हटले. या प्रकरणात विमा कंपनीवर जबाबदारी निश्चित करणारा पंजाब आणि हरियाणा उच्च न्यायालयाचा आदेश सर्वोच्च न्यायालयाने रद्द केला.
वैध परवान्याशिवाय वाहने चालवण्याच्या मुद्द्याकडे लक्ष वेधताना न्यायालयाने सांगितले, की अशा परिस्थितीत अपघात प्रकरणांत चालक किंवा वाहनमालक, किंवा दोघांनाही मोठी नुकसानभरपाई भरावी लागू शकते. याबाबत नागरिकांमध्ये जागरूकता निर्माण करण्यासाठी देशव्यापी मोहीम राबवण्याची गरज असल्याचेही न्यायालयाने नमूद केले.न्यायमूर्ती संजय करोल आणि न्यायमूर्ती एन. कोटिश्वर सिंह यांच्या खंडपीठाने केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालय; तसेच राज्यांच्या परिवहन विभागांना रस्ता सुरक्षा वाढवण्यासाठी आणि वाहतूक कायद्यांचे काटेकोर पालन सुनिश्चित करण्यासाठी देशव्यापी मोहीम राबवण्यास सांगितले. वाहनचालक प्रशिक्षण शाळांचे नियमन, त्या परवडण्याजोग्या करणे; तसेच परवाना अर्ज आणि चाचण्या प्रादेशिक भाषांमध्ये उपलब्ध करून देणे या बाबींमध्ये तातडीने सुधारणा करण्याची गरज असल्याचेही न्यायालयाने अधोरेखित केले. हे प्रकरण २००९ मधील अपघाताशी संबंधित आहे.