Participation In Five Art Forms Mandatory For Colleges Youth Festival 2026 27
पाच कलाप्रकारांत सहभाग बंधनकारक
महाराष्ट्र टाइम्स•
२०२६-२७ शैक्षणिक वर्षातील जिल्हा, केंद्रीय युवक महोत्सवासाठी महाविद्यालयांना हमीपत्र द्यावे लागणार आहे. आम्ही सादर करीत असलेल्या कोणत्याही कलाप्रकारात कुठल्याही प्रकारच्या भावना दुखावतील असा आशय, लेखन व सादरीकरण करणार नाही. शिवाय कुणाच्याही अस्मितेला तडा जाईल, संत व महापुरुषांचा अवमान होईल. अशा असंवैधानिक आशयाचे आमचे महाविद्यालय समर्थन करीत नाही व तसे करणार नाही याची निःसंदिग्ध ग्वाही देत आहोत. आमच्या कुठल्याही सादरीकरणातून काही अनर्थ घडला, सामाजिक सौहार्द बिघडले तर त्याची सर्वस्वी जबाबदारी असेल, अशा आशयाचे हमीपत्र प्रत्येक संघाला द्यावे लागणार आहे. या हमीपत्राची चर्चा प्राध्यापक, संघ प्रमुखांमध्ये होते आहे.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या वतीने घेण्यात येणाऱ्या युवक महोत्सवात महाविद्यालयांना किमान पाच कला प्रकारात सहभाग, सादरीकरण बंधनकारक करण्यात आले आहे. पाचपेक्षा कमी कला प्रकारात, सादरीकरण केले तर अशा महाविद्यालयांना दहा हजार रुपयांचा दंड भरावा लागणार आहे. तसेच ‘सादर करीत असलेल्या कोणत्याही कलाप्रकारात कुठल्याही प्रकारच्या भावना दुखावतील असा आशय, लेखन व सादरीकरण करणार नाही’, अशा आशयाचे हमीपत्र महाविद्यालयांना द्यावे लागणार आहे. महोत्सवासाठी ऑनलाइन नोंदणीची प्रक्रिया १ ऑगस्टपासून सुरू होणार आहे.विद्यापीठाच्या वतीने जिल्हा व विद्यापीठ अशा दोन स्तरांवर महोत्सव घेण्यात येतो. २०२६-२७ शैक्षणिक वर्षातील जिल्हास्तरीय युवक महोत्सव १ ते १२ सप्टेंबर या काळात आयोजित करण्यात येणार आहे. विद्यापीठाच्या कार्यक्षेत्रात छत्रपती संभाजीनगर, बीड, जालना, धाराशीव जिल्हे येतात. जिल्हानिहाय युवक महोत्सवानंतर ५ ते ७ ऑक्टोबर दरम्यान विद्यापीठस्तरावर केंद्रीय युवक महोत्सव आयोजित करण्यात येणार आहे. महोत्सवासाठी कुलगुरू डॉ. विजय फुलारी व सल्लागार समिती यांच्या मार्गदर्शनाखाली युवक महोत्सवाची नियमवाली तयार करण्यात आली आहे. महोत्सवातील सहभागासाठी विद्यार्थी कलावंत, साथीदार, संघप्रमुखांच्या ऑनलाइन नोंदणीची प्रक्रिया १ ते १७ ऑगस्टपर्यंत नोंदणी करावी लागणार असून जिल्हास्तरीय व केंद्रीय युवा महोत्सव अंतर्गत सादर होणाऱ्या सर्वच कलाप्रकारासाठी एकत्रित नोंदणी करावी. सर्व प्रपत्रे, आवश्यक कागदपत्रांसह प्रवेशिकेची हार्ड कॉपी विद्यापीठात २२ ऑगस्टपर्यंत जमा करावी, असे विद्यापीठाने निर्देश दिले आहेत. विद्यापीठाशी संलग्न महाविद्यालयांची संख्या ४८४ एवढी असून, पावणेतीन लाख विद्यार्थी विविध अभ्यासक्रमांना प्रवेशित होतात. महोत्सवातील नोंदणीबाबत प्राचार्य, सांस्कृतिक विभागप्रमुख यांना विद्यार्थी विकास मंडळाने पत्राद्वारे कळविल्याचे संचालक डॉ. कैलास अंभुरे यांनी कळविले आहे.
सहभागी संघात दोन व्यवस्थापकांसह ४५ जणांचा संघ अपेक्षित आहे. संगीत, नृत्य, नाट्य, वाङ्मय व ललित कला अशा पाच गटांत २८ कलाप्रकार सादर होतील. यामध्ये भारतीय शास्त्रीय गायन, शास्त्रीय तालवाद्य, शास्त्रीय सुरवाद्य, नाट्यसंगीत, सुगम गायन, लोक आदिवासी नृत्य, वक्तृत्व, वादविवाद, प्रश्नमंजुषा, एकांकिका, प्रहसन, मूक अभिनय, चित्रकला, कोलाज आदी स्पर्धा असणार आहेत. यंदा पाच कला प्रकारात सहभाग बंधनकारक आहे.