प्रशासन ऐकत नाही

महाराष्ट्र टाइम्स•
प्रशासन ऐकत नाही
(फोटो- महाराष्ट्र टाइम्स)
स्थायी समितीच्या बैठकीत सभापतींनी दिलेले आदेश ऐकले जात नाहीत असा आरोप करीत सदस्यांनी पालिका प्रशासनावर घणाघात केला. सभापतींनी दिलेले आदेश ऐकलेच पाहिजेत असे सदस्यांनी अधिकाऱ्यांना सांगितले.

सभापती अनिल मकरिये यांच्या अध्यक्षतेखाली गुरुवारी (३० जुलै) स्थायी समितीची बैठक झाली . सुमारे दोन तास चाललेल्या या बैठकीत विषय पत्रिकेवरील विषय मंजूर झाल्यावर स्थायी समितीच्या सदस्यांनी मांडलेल्या विविध मुद्यांवर चर्चा करण्यात आली.
सुरुवातीलाच भाजपचे राजगौरव वानखेडे यांनी पालिका प्रशासन ाला लक्ष केले. स्थायी समितीच्या बैठकीत झालेल्या निर्णयांपैकी आणि सभापतींनी दिलेल्या आदेशांपैकी किती निर्णयांचे आणि आदेशांचे पालन करण्यात आले असा सवाल त्यांनी केला. प्रशासन स्थायी समितीला गांभीर्याने घेत नाही असे ते म्हणाले. निर्णयांवर कार्यवाही होत नाही असा उल्लेख त्यांनी केला. चार दिवसात खड्डे बुजवा असे आदेश सभापतींनी दिले होते, त्याचे काय झाले ? आदेश देऊन पंधरा दिवस होऊन गेले असे ते म्हणाले. प्री ऑडिट बंद करण्याच्या आदेशाचेही अद्याप पालन झालेले नाही . स्थायी समितीने दिलेल्या आणखीन बऱ्याच आदेशांचे पालन अद्याप झाले नाही असे त्यांनी स्पष्ट केले.

भाजपच्या माधुरी अदवंत यांनी देखील प्रशासन स्थायी समितीबद्दल गंभीर नसल्याचे म्हटले. स्थायी समितीच्या पहिल्या बैठकीपासून आतापर्यंत किती निर्णय झाले आणि किती निर्णयांची अंमलबजावणी झाली याचा खुलासा झाला पाहिजे असे त्या म्हणाल्या. सुरेंद्र कुलकर्णी यांनी देखील प्रशासनाच्या भूमिकेबद्दल नाराजी व्यक्त केली.

वंचित बहुजन आघाडीचे अमित भुईगळ यांनी प्रशासनाकडून निर्णयांची अंमलबजावणी होत नसेल तर तसे सांगा, अंमलबजावणी कशी करुन घ्यायची हे आम्हाला पक्के माहिती आहे असे म्हणत अधिकाऱ्यांना एक प्रकारे इशाराच दिला. यावर बोलताना सभापती अनिल मकरिये म्हणाले, झालेले निर्णय आणि त्याची अंमलबजावणी या बद्दल आयुक्तांशी चर्चा झाली आहे. अंमलबजावणी करण्याबद्दल त्यांना पुन्हा एकदा सांगितले आहे. निर्णयांची अंमलबजावणी करण्याचे त्यांनी मान्य केले आहे.