Urgent Tender Issued For Filling Potholes In The City
खड्डे बुजवण्यासाठी तीन दिवसांची निविदा
महाराष्ट्र टाइम्स•
(फोटो- महाराष्ट्र टाइम्स)
शहरातील मुख्य रस्त्यांवर पडलेले खड्डे बुजवण्यासाठी तीन दिवसांच्या मुदतीची निविदा काढली असून दोन दिवसात खड्डे बुजवण्याचे काम सुरु होईल अशी माहिती स्थायी समितीच्या बैठकीत अधिकाऱ्यांनी दिली. मुरुम टाकून खड्डे बुजवण्याचे काम करण्यात येणार असल्याचेही स्पष्ट करण्यात आले.
पाणी पुरवठा योजनेचे काम, ड्रेनेज लाईनचे काम आणि गॅस लाईन टाकण्याचे काम यामुळे शहरातील बहुतांश रस्त्यांवर खड्ड्यांचे साम्राज्य निर्माण झाले आहे. वाहने चालवण्यासारखेच काय पण पायी जाण्यासारखे देखील रस्ते राहिलेले नाहीत. त्यामुळे पंधरा दिवसांपूर्वी झालेल्या स्थायी समितीच्या बैठकीत नगरसेवकांनी खड्ड्यांवरुन प्रशासनाला कोंडीत पडकले . सभापती अनिल मकरिये यांनी चार दिवसात खड्डे बुजवण्याचे आदेश प्रशासनाला दिले. परंतु अद्याप हे काम सुरु झालेले नाही. त्यामुळे स्थायी समितीच्या बैठकीत नगरसेवक पुन्हा आक्रमक झाले. राजगौरव वानखेडे यांनी खड्डयांचा विषय उपस्थित केला. त्यानंतर सुरेंद्र कुलकर्णी यांनी जवाहरकॉलनीसह विविध भागातील खड्ड्यंची समस्या उदाहरणासह मांडली. दोन रस्ते एक मेकांना योग्य पध्दतीने का जोडले जात नाहीत ? दोन्ही रस्त्यांमध्ये अंतर का ठेवले जाते ? रस्त्यांमध्ये असलेल्या अंतरामुळे मोठे खड्डे निर्माण झाले आहेत. त्यातून मार्ग काढताना नागरिकांना पाठीचे आजार होऊ लागले आहेत असे ते म्हणाले. वानखेडे यांनी सर्वसाधारण सभेत प्रशासनाने खड्डे बुजवण्यासाठी ठेवलेल्या ९९ लाख रुपयांच्या प्रस्तावाचा उल्लेख केला. एवढ्या तुटपुंज्या तरतूदीमध्ये संपूर्ण शहरातील खड्डे कसे बुजवले जाणार असे ते म्हणाले.
यावर सभापती अनिल मकरिये यांनी शहर अभियंता संजय कोंबडे यांना खुलासा करण्यास सांगितले. कोंबडे म्हणाले, खड्डे बुजवण्यासाठी तीन दिवस मुदतीची निविदा काढली आहे. तीन दिवस संपल्यावर पात्र कंत्राटदाराला वर्कऑर्डर देऊन दोन दिवसात खड्डे बुजवण्याचे काम सुरु करण्यात येईल. मुख्य रस्त्यांवरील खड्डेच बुजवण्याची तरतूद करण्यात आली आहे. नगरसेविका श्वेता त्रिवेदी यांनी पैठण रोडवरील खड्ड्यांचा विषय मांडला. पैठण रोड पाणी पुरवठा योजनेसाठी खोदण्यात आला आहे, तो तातडीने सुस्थितीत आणा असे त्या म्हणाल्या. सध्या पाऊस सुरु आहे, त्यामुळे डांबरीकरण करणे शक्य नसल्यास किमान रस्त्याच्या पृष्ठभागापर्यंत खडीकरण करा वाहतुकीसाठी रस्ता सुस्थितीत आणा अशी मागणी त्यांनी केली. सातारा देवळाई भागातील प्रकाश एक योजने अंतर्गत लावण्यात येत असलेल्या पथदिव्यांचा विषय देखील त्यांनी उपस्थित केला. सुधाकरनगर, सातारा गाव, ज्योती प्राईड यासह अन्य भागांमध्ये पथदिवे लावण्याची मागणी त्यांनी केली.