चिखलात दुचाकी घसरल्याने पाचजण जखमी

Contributed by: पाथर्डी,म. टा. वृत्तसेवा|महाराष्ट्र टाइम्स.कॉम•
चिखलात दुचाकी घसरल्याने पाचजण जखमी
पाथर्डी गावालगत जलवाहिनीच्या कामासाठी खोदकाम करताना फुटलेल्या ड्रेनेजचे पाणी रस्त्यावर सोडण्यात आल्यामुळे झालेल्या चिखलात शनिवारी (दि. ३१) रात्री दोन दुचाकी घसरल्या. या घटनांमध्ये चार महिन्यांच्या बाळासह पाच जण जखमी झाले.

गावातील खंडेराव मंदिराजवळ खोदकाम सुरू आहे. त्यात ड्रेनेजलाइन फुटल्याने दुर्गंधीयुक्त पाणी रस्त्यावर सोडल्याने चिखल झाला आहे. शनिवारी सायंकाळी गौळाणे रस्त्यावर राहणारे दाम्पत्य बाळासह दुचाकीने जात असताना, या चिखलावरून घसरून जखमी झाले. उपचारासाठी त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. सुखदेव चौधरी आणि त्यांची मुलगी रिंकू यांनाही दुखापत झाली आहे. या आधीदेखील अनिल कापसे, शिवाजी डेमसे यांच्यासह आठ दिवसांत सात ते आठ जण घसरून पडले आहेत.