कॉर्पोरेट गिफ्टमध्ये आर्टिसनल चॉकलेटचे वेड

Contributed by: पृथा वीरprutha.veer@timesofindia.com|महाराष्ट्र टाइम्स.कॉम•
कॉर्पोरेट गिफ्टमध्ये आर्टिसनल चॉकलेटचे वेड
छत्रपती संभाजीनगर : चॉकलेट म्हणताच लहान मुलेच नाही तर मोठ्या माणसांचाही चेहरा खुलतो. म्हणूनच दिवाळी आली की गिफ्ट म्हणून चॉकलेट आवर्जून दिली जातात. कॉर्पोरेट गिफ्ट म्हणून चॉकलेटला प्राधान्य असते. दिवाळीचा गोडवा व ऋणानुबंध जपणाऱ्या या चॉकलेट ट्रेंडमध्ये यंदा ‘आर्टिसनल’ चॉकलेट म्हणजे हॅण्डक्राफ्टेड चॉकलेटला मागणी असून मिठाई इतकीच चॉकलेट फजलाही पसंती आहे.

आर्टिसनल चॉकलेट हे लहान बॅचेसमध्ये तयार केलेले अतिशय उत्तम चवीचे चॉकलेट मानले जाते. हे चॉकलेट बीन-टू-बार प्रक्रियेतून म्हणजे थेट कोकोच्या बियाण्यांपासून तयार केले जाते. यात एकाच भागातील आणलेल्या कोको बीन्सचा वापर केला जातो. महत्त्वाचे म्हणजे यात प्रिझर्व्हेटिव्हज नसतात. व्यावसायिक आणि आर्टिसनल चॉकलेटमधील फरक बघितला तर आर्टिसनल चॉकलेटच्या प्रत्येक बॅचची चव वेगळी लागते. यात लेमन ग्रास, मलाइ,कॅरेमल, ड्रायफ्रूटचा वापर होतो. या चॉकलेटमध्ये सेंटर फील्ड चॉकलेट असतात. म्हणजे या चॉकलेटच्या आत चवदार सारण भरलेले असते. चॉकलेटचे बाहेरचे आवरण कडक असले तरी आतले सारण पातळ असते. चॉकलेट खाल्ल्यावर वरचे चॉकलेट फुटून आतील द्रव किंवा मऊ फ्लेवर तोंडात पसरतो. ही प्रक्रिया अत्यंत किचकट असते. म्हणूनच आर्टिसनल चॉकलेटला प्रिमियम श्रेणीतील चॉकलेट म्हणतात. या चॉकलेटच्या बॅचला किमान दोन-दोन तास मेहनत घ्यावी लागते. यातल्या एकेक चॉकलेटवर अत्यंत नाजूक हस्तकाम करावे लागते. एखाद्या कुशल कारागीर दागिन्यांवर जसे काम करतो, तसेच आम्ही या चॉकलेटवर मेहनत घेतो असे प्रतिश भालेराव यांनी सांगितले.
प्रतीश यांचा आर्टिसनल चॉकलेटचा स्टार्टअप असून ते त्यांची आई स्वाती यांच्यासोबत असे प्रिमियम चॉकलेट तयार करतात. कॉर्पोरेट गिफ्टमध्ये मिठाईपेक्षा चॉकलेट ‘फज’वर भर आहे. फजमध्ये जास्तीत जास्त पेंडखजूरचा वापर आहे. यामुळे शुगर फ्री, व्हेज व व्हेगन फूड म्हणूनही त्याचा वापर होतो. फज तोंडात टाकताच विरघळेल इतका मऊ आणि क्रीमी असतो. कॉर्पोरेट गिफ्टमध्ये पॅकेजिंगचे आपले महत्त्व आहे .

कॉर्पोरेट गिफ्टमध्ये आर्टिसनल चॉकलेटचे वेड